Kanchenjunga Express- Goods Train Accident West Bengal : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने जोरदार धडक दिल्याने एक्स्प्रेसच्या मागील बाजूचे तीन डबे रुळांवरून घसरले. सोमवारी सकाळी झालेल्या या अपघातात सात प्रवासी आणि दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून ४१ जण जखमी आहेत. प्राथमिक अहवालानुसार मालगाडीच्या चालकाने वेगमर्यादा ओलांडल्याने अपघात घडल्याची माहिती आहे. या अपघातात माणुसकीचंही दर्शन झालं आहे. ईदचा उत्साह सोडून अनेकांनी बचावकार्याला प्राधान्य दिलं. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सोमवारी सर्वत्र ईद अल अधाचा उत्साह होता. मोहम्मद मोमिरुल (३२)सारख्या अनेक रहिवाशांनी नमाज अदा करून दिवसाची सुरुवात केली. तेवढ्यातच कांचनजंगा एक्स्प्रेसला धडक बसल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. याबाबत मोहम्मद मोमिरुल म्हणाले, “मी नमाज अदा करून नुकताच परतत होतो. घरातील सर्वजण आनंद साजरा करण्याच्या मूडमध्ये होते. तेव्हा अचानक मोठा आवाज आला. मी माझ्या घराजवळील रेल्वे रुळांवर धाव घेतली आणि रुळांवरून घसरलेले डबे पाहिले. मालगाडीचा लोको पायलट पॅसेंजर ट्रेनच्या चाकाखाली मला पडलेला दिसला. मी त्याच्याकडे पोहोचेपर्यंत तो गतप्राण झाला होता.”

हेही वाचा >> West Bengal Train Accident : “अनेकजण ओरडत होते, मी बाहेर येऊन बघितलं तर…”, प्रवाशाने सांगितला अपघातावेळीचा प्रसंग!

मोमिरुल यांच्यासोबत निर्मल जोते येथील १५० हून अधिक रहिवाशांनी बचावकार्यात मदत केली. ईदचा उत्साह विसरून त्यांनी प्रवाशांना वाचवण्यासाठी प्राधान्य दाखवलं. रुग्णवाहिका नसल्यामुळे अनेकांनी आपल्याच वाहनातून प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात नेले. तर काही प्रवाशांनी विश्रांतीसाठी स्थानिक रहिवाशांच्या घरी आसरा घेतला.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तासाभराने अपघातस्थळी पोहोचले. निर्मल जोते येथील आणखी एक रहिवासी मोहम्मद नजरुल यांनी सांगितले की, त्यांना अपघातस्थळी सहा मृतदेह सापडले आणि सुमारे ३५ जणांना वाचवले.

बालासोर अपघाताविषयी माहिती होतं, पण…

“मी उत्सवाची तयारी करत होतो. अपघाताची माहिती पसरताच मी घटनास्थळी गेलो. यात एक वृद्ध महिला जखमी झाली होती, तिला उभे राहता येत नव्हते. मी तिला पाण्यासाठी रडताना पाहिलं. ती असहाय्य दिसत होती. मी तिला धीर दिला आणि नंतर तिचे नातेवाईक सिलीगुडीहून आले आणि तिला परत घेऊन गेले”, असं येथील रहिवासी तस्लिमा खातून म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “मागील वर्षी बालासोर रेल्वे अपघात झाला तेव्हाच्या बातम्या पाहिल्याचं मला आठवतं, पण मी असं काही पाहीन असं कधीच वाटलं नव्हतं”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.