India condemns Hormuz Strait ship attack on Mayuree Naree vessel bound for Gujarat : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गुजरातच्या कांडला बंदराकडे येणाऱ्या ‘मयुरी नारी’ (Mayuree Naree) या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने अधिकृतपणे निषेध केला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये थाई व्यापारी जहाजावर झालेल्या लष्करी हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन जारी केले आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जाणे वाढत असल्याचा मुद्दा देखील परराष्ट्र मंत्रालयाने उपस्थित केला आहे.
दरम्यान ‘मयुरी नारी’ (Mayuree Naree) या नावाचे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना या त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हे जहाज भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गुजरातच्या कांडला या बंदराकडे येत होते.
“पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान व्यावसायिक शिपिंगला लष्करी हल्ल्यांचे लक्ष्य बनवले जात असल्याचा भारत तीव्र निषेध करतो,” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. “या हल्ल्यांची तीव्रता आणि प्राणघातकता वाढतच असल्याचे दिसून येत आहे,” असेही मंत्रालयाने नमूद केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने हे देखील नमूद केले की, या संघर्षादरम्यान यापूर्वी झालेल्या सागरी हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश होता.
भारताने या संघर्षात सहभागी असलेल्या सर्व पक्षांना व्यापारी जहाजांना लक्ष्य न करण्याचे आणि सिव्हीलीयन क्रू मेंबर्सचा जीव धोक्यात न घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारताने आपल्या ‘फ्रिडम ऑफ नेव्हिगेशन’ आणि ‘अनइम्पीडेड मॅरिटाइम कॉमर्स’च्या बाजूने असलेल्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चारही केला आहे.
२० जणांना वाचवले
ओमानच्या नोदलाने हल्ला झाल्याच्या काही काळाताच बचाव मोहिम सुरू केली. या जहाजातून २० क्रू मेंबर्सना सुखरूप वाचवणात यश आले, तर तीन जणांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्यांतर जहाज सोडून समुद्रात उड्या घेतलेल्या क्रू सदस्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तसेच जहाजावर लागलेली आग देखील नंतर नियंत्रणात आणण्यात आली. मात्र या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची व्याप्ती अद्याप समजू शकलेली नाही.
