शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात पंजाबमध्ये आंदोलकांनी अभिनेत्री कंगना रणौतची गाडी रोखत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच या वक्तव्यांसाठी तिने माफीची मागणी केली. यानंतर कंगनाने आपल्या इंस्टाग्रामवर काही व्हिडीओ शेअर करत आंदोलकांवर शिवीगाळ केल्याचा आणि हल्ला करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. कंगनाने अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत.तसेच खूप लोक माझ्या नावावर राजकारण करत असल्याचाही आरोप केला.

कंगना म्हणाली, “माझं विमान रद्द झाल्याने मी आत्ताच हिमाचल प्रदेशमधून निघाले आहे. पंजाबमध्ये येताच जमावाने मला घेरलं आहे. ते स्वतःला शेतकरी असल्याचं सांगत आहेत. ते माझ्यावर हल्ला करत आहेत आणि वाईट शिवीगाळ करत आहेत. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील देत आहेत. या देशात खुलेआम या प्रकारचा मॉब लिचिंग सुरू आहे. माझ्यासोबत सुरक्षा रक्षक नसते तर येथे कशी परिस्थिती असती? येथील परिस्थिती अविश्वसनीय आहे.”

“पोलीस असताना देखील माझ्या गाडीला जाऊ दिलं जात नाही”

“मोठ्या प्रमाणात पोलीस असताना देखील माझ्या गाडीला जाऊ दिलं जात नाहीये. मी कुणी राजकारणी आहे का? मी एखादा पक्ष चालवते का? हे वर्तन काय आहे,” असं कंगनाने सांगितलं.

“पोलीस नसते तर सर्वांसमोर लिंचिग होईल”

कंगना म्हणाली, “खूप लोक माझ्या नावावर राजकारण करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज जे होतंय ते होतंय. जमावाने माझ्या गाडीला पूर्णपणे घेरलंय. इथं पोलीस नसते तर सर्वांसमोर लिंचिग होईल. या लोकांचा निषेध.”

हेही वाचा : “इंदिरा गांधींनी खलिस्तान्यांना आपल्या चप्पलेखाली डासांप्रमाणे चिरडलं अन्…”, कंगनाच्या नव्या पोस्टवर वाद

दरम्यान, यानंतर कंगनाने पोस्ट केलेल्या आणखी एका व्हिडीओत कंगना आंदोलन करणाऱ्या महिलांसोबत बोलत असल्याचं दिसत आहे. त्यातील दोन महिला कंगनासोबत बोलत आहेत. यातील एका महिलेने कंगनाला बोलताना विचार करून बोलत जा असा इशारा दिल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळालं. याशिवाय अन्य एक महिला कंगनासोबत फोटो काढण्याविषयी बोलतानाही दिसलं.

काही वेळाने कंगनाने आणखी व्हिडीओ पोस्ट करत पोलिसांनी तिची गाडी जमावाच्या गराड्यातून सुरक्षितपणे काढून दिल्याचं सांगितलं. तसेच पंजाब पोलिसांचे आभार मानले.