भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्यातील शाब्दिक युद्ध आता अधिकच पेटले आहे. जनरेशन झेड (Gen Z) आंदोलकांवर केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेला हा वाद आता थेट वैयक्तिक चिखलफेकीपर्यंत पोहोचला आहे. बाबा रामदेव यांनी कंगनाच्या भूतकाळावर आणि चारित्र्यावर बोट ठेवत टीका केल्यानंतर, कंगनाने अत्यंत प्रत्युत्तर दिले आहे. “बाबा रामदेव माझ्या बेडरूममध्ये वटवाघळासारखे टांगलेले होते का, जे त्यांना माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सर्व माहिती आहे?” असा संतप्त सवाल कंगनाने केला आहे.

‘सनातन धर्माचे नाव सांगून उद्योगपती बनले’

‘दूरदर्शन न्यूज’ (DD News) ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत कंगनाने बाबा रामदेव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सनातन विचारांचा दावा करणारे बाबा रामदेव तुमच्याविरोधात का उभे ठाकले आहेत, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.

यावर उत्तर देताना कंगना म्हणाली, “जेव्हा बाबा रामदेव यांनी ‘स्वदेशी आंदोलना’ची सुरुवात केली, तेव्हा सरकारने त्यांना मोठा पाठिंबा दिला. मात्र, आता ते सनातन विचारांपासून भरकटले असून पूर्णपणे भांडवलशाहीत रुतले आहेत. एका टप्प्यावर सनातन विचार आणि भांडवलशाही यांच्यात संघर्ष अटळ असतो.”

ती पुढे म्हणाली, “आयुर्वेद, जडीबुटी आणि योगाचा प्रचार करता करता बाबा रामदेव आता थेट बनियान आणि अंडरवेअर विकण्याच्या व्यवसायात उतरले आहेत. उद्योगपती बनण्यात काही गैर नाही, पण त्यासाठी साधू-संतांचा मुखवटा घालण्याची गरज नाही. त्यांनी मला चारित्र्याचे धडे शिकवू नयेत.”

नेमका वाद काय?

काही दिवसांपूर्वी कंगनाने आंदोलक तरुणांना ‘जनरेशन गटर’ असे संबोधले होते. यावर तीव्र आक्षेप घेत बाबा रामदेव यांनी कंगनाच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न उपस्थित केले होते. “तिची पात्रता काय? तिचे बालपण आणि तरुणपण कसे गेले? तिचे आधीचे कारनामे कसे आहेत? अशा लोकांबद्दल मला बोलायचे नाही. तिचे विचार विकृत आहेत आणि तिच्या पक्षाने याची दखल घेतली पाहिजे,” अशी टीका रामदेव यांनी केली होती.

या टीकेचा खरपूस समाचार घेत कंगनाने विचारले, “माझ्या तरुणपणात त्यांनी मला काय करताना पाहिले? त्यांनी काय पाहिले ते स्पष्ट सांगावे. बाबा रामदेव यांनी माझ्या बेडरूमबद्दल किंवा तरुणपणाबद्दल स्वप्ने पाहणे बंद करावे.”

सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करत जुन्या जखमांवर बोट

मुलाखतीपूर्वी कंगनाने आपल्या ‘इन्स्टाग्राम’ अकाउंटवरूनही बाबा रामदेव यांच्यावर टीका केली होती. पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि त्यांच्या कंपनीला फटकारल्याची आठवण कंगनाने करून दिली.

“ज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी ताशेरे ऐकावे लागले, त्यांनी अफवा आणि गॉसिपच्या आधारावर माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करू नयेत,” असा टोला तिने लगावला.

विवादाची सुरुवात कशी झाली?

दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनात सहभागी झालेल्या काही तरुणांच्या भाषेवर आणि वर्तनावर कंगनाने आक्षेप घेतला होता. तिने त्या आंदोलकांना ‘जनरेशन गटर’ म्हटले होते. तिच्या या वक्तव्यानंतर देशभरातून जोरदार टीका झाली.

त्यानंतर कंगनाने स्पष्टीकरण देताना म्हटले की, तिचे वक्तव्य सर्व तरुणांसाठी नव्हते, तर आंदोलनातील विशिष्ट घटकांसाठी होते. मात्र, तोपर्यंत बाबा रामदेव यांनी तिच्या भूतकाळावर भाष्य करत वादात उडी घेतली होती.

सध्या कंगना रणौत आणि बाबा रामदेव यांच्यातील हा वाद केवळ ‘जनरेशन झेड’पुरता मर्यादित न राहता, उद्योग, सनातन धर्म आणि वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत पोहोचल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.