Kangana Ranaut Baba Ramdev: योगगुरु बाबा रामदेव यांनी कंगना रणौतवर टीका केल्यानंतर आता कंगनाने देखील रामदेव बाबांनी प्रत्युत्तर दिले. जनरेशन गटर या विधानावरुन बाबा रामदेव यांनी कंगनावर टीका केली होती. यानंतर आता कंगनाने त्याला प्रत्युत्तर दिले असून आपल्याला चारित्र्याचे धडे देऊ नयेत, असा सल्ला दिला आहे. तसेच, माझं तारुण्य किंवा बेडरूमबद्दल दिवास्वप्नं पाहू नका, असा टोलाही कंगनाने लगावला.

बाबा रामदेव-कंगना यांच्यात वाद

भाजपा खासदार कंगनाने बाबा रामदेव यांच्या पतंजलीशी संबंधित वादात सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यावरूनही त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. कंगना रणौतने जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना ‘गटर जनरेशन’ म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती आणि कॉक्रोच गटरमध्ये राहतात, असे म्हटले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या विधानाचा निषेध करत कंगनाला खडेबोल सुनावले होते. मात्र, कंगनाने याबद्दल माफी मागितली नाही, तर उलट विधानाचे समर्थनच केले होते.

कंगनाने दिले प्रत्युत्तर

बाबा रामदेव यांच्या टीकेला कंगनाने इन्स्टाग्रामवरुन प्रत्युत्तर दिले आहे. “बाबा जी, माझं तारुण्य किंवा बेडरूमबद्दल दिवास्वप्नं पाहू नका. कोणीही केवळ अफवा आणि गप्पांच्या आधारावरच अंदाज लावू शकते. किमान मला कधीही सर्वोच्च न्यायालयाकडून खोट्या आणि फसव्या वैद्यकीय दाव्यांसाठी फटकारले गेले नाही, जे पक्क्या तथ्यांवर आधारित आहेत, कोणत्याही अंदाजावर नाही. त्यामुळे चारित्र्याबद्दल मला शिकवू नका, तुमच्यापेक्षा माझे चारित्र्य खूप चांगले आहे, माझ्यावर कोणताही फसवणुकीचा आरोप लागलेला नाही,” अशी टीका कंगनाने केली.

Kangana Post
Kangana Post

बाबा रामदेव काय म्हणाले होते?

बाबा रामदेव यांनी कंगनावर टीका केली होती. कंगनाचे वक्तव्य म्हणजे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले होते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा बाबा रामदेव यांना कंगनांच्या ‘गटर छाप’ विधानाबद्दल विचारण्यात आले. “कंगनाची पात्रता काय आहे? तिचे बालपण कसे गेले? तिचे तरुणपण कसे गेले आहे? तिची पूर्वीची कामगिरी काय आणि कशी राहिली आहे? मला अशा लोकांबद्दल बोलायचे नाही. देशातील अशा कोणत्याही तरुणांना आणि Gen Z ला गटर-पटर बोलणे, हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे, चुकीची गोष्ट आहे. यावर तिच्या पक्षातील लोकांनी दखल घेतली पाहिजे,” अशी टीका बाबा रामदेव यांनी केली होती.