भाजपा खासदार कंगना रणौतने भोजपुरी गायिका आणि आमदार आणि भोजपुरी गायिका मैथिली ठाकूर यांना पाठिंबा देत त्यांना ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. मैथिली ठाकूर या लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनाला १३ कोटींच्या रोल्स रॉईसमधून आल्या होत्या. त्यांचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताच लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली. ज्यानंतर कंगनाने मैथिली ठाकूरची बाजू घेत ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. गणेश उत्सव असताना विविध सेलिब्रिटी राजकारणी हे मुंबईतल्या लालबागचा राजा या गणपतीचं दर्शन घेत असतात. मैथिली ठाकूर यांनीही दर्शन घेतलं होतं. पण मैथिली रोल्स रॉईस कारने आल्याने तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं.

कंगनाची पोस्ट काय?

इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कंगना राणौत यांनी ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. ‘नेत्यांचं चांगलं आयुष्य पाहिल्यानंतर काही लोकांचा जळफळाट होतो. आता आमच्या एका तरुण आमदाराला ट्रोल केलं जात आहे. कारण आमदार आलिशान आयुष्य जगते आहे. भले आम्ही समाजाच्या सेवेसाठी काम करत आहोत. पण आमचं देखील करीअर आणि लोकप्रियता आहे, असं म्हणत कंगनाने मैथिली ठाकूर यांना ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. ‘आम्ही निस्वार्थ मनाने काम करत आहोत. पण असं असताना देखील आमचं आलिशान आणि चांगलं आयुष्य लोकांना का खटकत आहे? आम्ही चांगलं आयुष्य जगू शकत नाही का? आम्हाला लोकांच्या संपत्तीत कसलाच रस नाही. पण आम्ही कायम गरिबांसारखं जगलं पाहिजे, हे पूर्णपणे वाईट आहे.’ असंही कंगनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

लोकगायिका आणि बिहारच्या २६ वर्षीय आमदार मैथिली ठाकुर यांची आलिशान कार रोल्स-रॉइसबाबत चर्चा सुरू आहे. अलीकडेच त्या मुंबईत लालबागचा राजाच्या दर्शनासाठी केल्या होत्या. त्यांची गाडी पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. दरम्यान, मैथिली ठाकुर यांच्या उत्पन्नाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. सीए रुचिता वघानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, मैथिली ठाकुर यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात एकूण संपत्ती ४ कोटी रुपयांपेक्षा थोडी कमी दाखवली होती. आता त्यांच्याकडे १३ कोटी रुपयांची रोल्स-रॉइस कार आहे. सीए वघानी यांनी विचारले आहे की, ४ कोटींची नेटवर्थ असलेल्या व्यक्तीकडे १३ कोटींची कार कशी असू शकते? असा प्रश्न विचारला होता. तसंच मैथिलीला अनेकांनी ट्रोलही केलं होतं. मात्र याच ट्रोलर्सना खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. या उत्तराचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.