क्रिती सेनॉनन रक्षाबंधनची एक जाहिरात केली होती. या जाहिरातीतल्या तिच्या पोशाखावरुन तिला ट्रोल करण्यात आलं. अभिनेत्री आणि खासदार कंगनानेही नाव न घेता क्रिती सेनॉनवर टीका केली होती. रक्षाबंधन हा एक पवित्र सण आहे. अशा वेळी बिकिनी घालून भावाला राखी कोण बांधतं? असा सवाल तिने केला होता. तर राहुल गांधींनी क्रितीला पाठिंबा देत कुठल्या महिलेने कुठले कपडे परिधान करावेत याचं स्वातंत्र्य तिला आहे. महिलांना कपड्यांवरुन ट्रोल करणं सोडा असं म्हटलं होतं. तसंच स्मॅश द पॅट्रिआर्कीही म्हटलं होतं. त्यावर कंगनाने उत्तर दिलं आहे.
स्मॅश द पेट्रियार्की म्हणणाऱ्या राहुल गांधींना कंगनाचं उत्तर
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी क्रिती सेनॉनच्या रक्षाबंधन जाहिरात वादादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी अभिनेत्री क्रिती सेनॉनला पाठिंबा देत सोशल मीडियावर ‘स्मॅश द पेट्रियार्की’ (पितृसत्ताक पद्धती मोडून काढा) असा संदेश लिहिला होता. याला उत्तर म्हणून कंगनाने भाजपाच्या इंस्टाग्राम हँडलवरील एक कार्टून पोस्ट पुन्हा शेअर केली. यात कंगना यांनी लिहिले, “ब्रो, वेट. भारत माता की जय. सुरुवात करूया.” या पोस्टद्वारे भाजपाने तिहेरी तलाक, शाह बानो प्रकरण, महिला आरक्षण आणि कर्नाटक मंत्रिमंडळात महिलांच्या सहभागाबाबत काँग्रेसच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

क्रिती सेनॉनच्या जाहिरातीवरुन वाद
क्रिती सेनॉनने ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधन जाहिरातीत जे कपडे घातले होते त्यावरुन वाद सुरू होता. या वादामध्ये राहुल गांधींनी मंगळवारी क्रिती सेनॉनला पाठिंबा दिला आणि तिची इंस्टाग्राम स्टोरी रिप्लाय करत पुन्हा शेअर केली. राहुल गांधींनी लिहिले की, कोणतीही महिला काय परिधान करते, काय करते आणि कुठे जाते, ही तिची स्वतःची निवड आहे. महिलांच्या कपड्यांची आणि जीवनशैलीची ऑनलाइन पोलिसिंग म्हणजेच पहारेदारी करू नये. राहुल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ‘स्मॅश द पेट्रियार्की’ या हॅशटॅगचा वापर केला होता. त्यावरच हे उत्तर कंगनाने दिलं आहे.
GIVA कंपनीने जाहिरात घेतली मागे
आम्हाला भारताची संस्कृती आणि इथले सण तसंच उत्सव यांच्याविषयी नितांत आदर आहे. एक ब्रांड म्हणून आम्ही कायमच हा प्रयत्न करतो की आमच्या ब्रांडच्या वस्तूंसह तुमचं सगळं कुटुंब कशा पद्धतीने सण आणि उत्सव साजरे करेल. अनेकांकडे पाळीव प्राणीही असतात त्यामुळे आमच्या जाहिरातीत पाळीव प्राणीही दिसला होता आणि सेलिब्रेशनची एक खास पद्धत आम्ही दाखवली होती. मात्र आमच्या या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जाहिरातीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी आम्ही प्रचंड दिलगीर आहोत. कारण जाहिरात तयार करताना आमचा असा काहीही हेतू नव्हता. आम्ही भारतीय परंपरेचा आदर करतो आणि ही जाहिरात आमच्या सर्व प्लॅटफॉर्मवरुन हटवत आहोत. येणाऱ्या सण उत्सवांसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि सकारात्मकतेच्याही शुभेच्छा असं म्हणत कंपनीने पोस्ट केली आहे आणि जाहिरात हटवत असल्याचं जाहीर केलं आहे.
