Himachal HC issues notice to Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार कंगना रणौत अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्या निवडीला हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. नोटीस जारी करत न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी कंगना रणौत यांच्याकडून २१ ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, ही याचिका किन्नौरचे रहिवासी अपक्ष उमेदवार लायक राम नेगी यांनी दाखल केली आहे. विहित निकषांची पूर्तता करूनही त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला, असा युक्तिवाद त्यांनी या याचिकेद्वारे केला आहे. अशा परिस्थितीत कंगना रणौत यांची निवडणूक रद्द करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

‘रिटर्निंग ऑफिसरने कोणतेही कारण न देता उमेदवारी नाकारली’

रिटर्निंग ऑफिसरवर ठपका ठेवत त्यांना या प्रकरणात पक्षकार बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. लायक राम नेगी हे वनविभागाचे माजी कर्मचारी आहेत. त्यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली आणि उमेदवारी अर्ज भरताना रिटर्निंग ऑफिसरकडे थकीत नसलेली प्रमाणपत्रेही सादर केले. वीज, पाणी, दूरध्वनी आदी विभागांकडून थकीत नसलेली प्रमाणपत्रे घेण्यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली होती. मात्र, नेगी यांनी सर्व दाखले सादर केले असता, निवडणूक अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा >> कंगना रणौत यांची महाराष्ट्र सदनातील भेट वादात

लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १०० अन्वये याचिका फेटाळली जाऊ शकते. जर याचिकाकर्त्याने आपला उमेदवारी अर्ज बेकायदा दाखल केला होता हे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यास मंडीतील निवडणुकीला दिलेले आव्हान अवैध ठरवले जाऊ शकते नाकारले.

हेही वाचा >> कंगना रणौत, हेमा मालिनी ते अरुण गोविल! लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या सेलिब्रिटींचं काय झालं?

कंगना रणौत यांना किती मते मिळाली?

अभिनेत्री कंगना रणौत आधीपासूनच नरेंद्र मोदींची चाहती राहिली आहे. त्यामुळे तिला मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्यावर फारसे कुणाला आश्चर्य वाटले नाही. या निवडणुकीमध्ये तिच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचे आव्हान होते. मात्र, कंगनाने या निवडणुकीमध्ये ५,३७,०२२ मते मिळवून ७४,७५५ मताधिक्याने विजय प्राप्त केला. काँग्रेसचे उमदेवार विक्रमादित्य सिंह हे रामपूर संस्थानाच्या राजघराण्याचे वंशज आणि हिमाचलचे सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या विदर्भ सिंह यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचे पारडेही तसे जड मानले जात होते. मात्र, कंगनाने नरेंद्र मोदींच्या नावावर प्रचार करून या निवडणुकीत यश मिळवले. या विजयानंतर कंगनाने म्हटले आहे, “या समर्थन, प्रेम व विश्वासासाठी मंडीतील सर्व लोकांचे मनापासून आभार. हा तुम्हा सर्वांचा विजय आहे, हा पंतप्रधान मोदीजी व भाजपवरील विश्वासाचा विजय आहे, हा सनातनचा विजय आहे, हा मंडीच्या सन्मानाचा विजय आहे.”