नसरुद्दीन शाह आणि खासदार-अभिनेत्री कंगना रणौत यांच्यातील शाब्दिक युद्ध आता अधिकच तीव्र झाले आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सुरू झालेल्या या वादात कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूडच्या दुटप्पीपणावर तिखट शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “बॉलिवूडचे पाकिस्तानवर भलतंच प्रेम आहे आणि हे प्रेम अजूनही संपलेले नाही,” असा घणाघाती आरोप करत कंगनाने चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांवर निशाणा साधला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने आपल्या पूर्वीच्या वक्तव्यांचे समर्थन करत बॉलिवूडच्या मौनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
‘बॉलिवूडचे पाकिस्तानवरील प्रेम कधी संपणार?’
वृत्तसंस्था ‘एएनआय’ला (ANI) दिलेल्या मुलाखतीत कंगनाने बॉलिवूडच्या भूमिकेवर थेट सवाल केले. ती म्हणाली, “चित्रपट असोत, कलाकारांची वक्तव्ये असोत किंवा त्यांच्या मुलाखती… बॉलिवूडचे पाकिस्तानवरील प्रेम नक्की कधी संपणार? देशाच्या फाळणीला इतकी वर्षे उलटूनही हे प्रेमप्रकरण अजूनही का थांबत नाही? याचे उत्तर बॉलिवूडच्या दिग्गजांनी दिले पाहिजे.”
आपल्या जुन्या अनुभवांचा दाखला देत तिने सांगितले की, “जेव्हा संसदेवर हल्ला झाला किंवा माझ्या घराबाहेर अडीच हजार लोकांचा जमाव चालून आला होता, तेव्हा हे सर्व कलाकार गप्प बसले होते. माझ्या घराच्या गेटवर लोक चढले होते आणि सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला होता. पण अशा वेळी ही मंडळी मूग गिळून गप्प बसतात आणि सोयीनुसार अश्रू ढाळतात.”
‘मगरीचे अश्रू ढाळणे थांबवा’; दुटप्पीपणावर कंगनाचा हल्ला
दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना कंगनाने चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. झारखंडमधील नोकरभरती घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरुणांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा उल्लेख करत ती म्हणाली, “दिल्लीतील आंदोलनावर जे कलाकार मगरीचे अश्रू ढाळत होते, ते आता झारखंडमधील तरुणांवर झालेल्या अत्याचारावर गप्प का आहेत? तिथे आंदोलन करणारे तरुण ‘जेन-झी’ (नवी पिढी) नाहीत का? बॉलिवूडचा हा सोयीस्कर दुटप्पीपणा आता देश सहन करणार नाही.”
‘कुत्रा’ आणि ‘कोल्हा’ वक्तव्यावरून वाद का पेटलाय?
या संपूर्ण वादाची ठिणगी नसरुद्दीन शाह यांच्या एका विधानाने पडली होती. आंदोलनावर गप्प बसणाऱ्या कलाकारांबद्दल बोलताना ते म्हणाले होते, “तोंडातील हाडूक धरलेला कुत्रा भुंकू शकत नाही. ज्या दिवशी कलाकारांचा विवेक जागृत होईल, त्या दिवशी ते बोलतील.”
या टीकेला कंगनाने सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. तिने लिहिलं होतं की..
- “आजच्या काळात कोणाला ‘कुत्रा’ म्हणणे हे कौतुकास्पद आहे, कारण प्रामाणिकपणा आणि निष्ठा आता दुर्मिळ झाली आहे.”
- “ज्या देशाचे खाते, त्याच देशाचे रक्षण करण्यासाठी लढण्याचा मला अभिमान आहे.”
- **”नसरुद्दीन शाह यांच्यासारखा विश्वासघातकी ‘कोल्हा’ (लोमडी) होण्यापेक्षा मी देशाशी प्रामाणिक असणारा कुत्रा होणे पसंत करेन.”
झारखंडमधील आंदोलनाचा मुद्दा संसदेत
झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील गोंधळ आणि घोटाळ्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार, पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केला होता. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. कंगनाने हा मुद्दा संसदेतही उपस्थित करत प्रशासकीय कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काही दिवसांपूर्वी ‘जेन-झी’ पिढीवर केलेल्या टीकेमुळे वादात सापडलेल्या कंगनाने आता मात्र विद्यार्थ्यांची बाजू घेत नसरुद्दीन शाह आणि बॉलिवूडवर जोरदार हल्ला चढवला आहे. या वादामुळे राजकीय वर्तुळात आणि हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
