Kangana Ranaut on Indira Gandhi: शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या आणि नंतर भाजपानं समज दिलेल्या खासदार व अभिनेत्री कंगना रणौत या आता त्यांच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आल्या आहेत. १९७६ साली आणीबाणीच्या काळात नेमकी काय परिस्थिती होती, यासंदर्भात भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटावर काही शीख संघटनांनी बंदीची मागणीही केली होती. त्यामुळे एकीकडे चित्रपटाबाबत उत्सुकता असताना दुसरीकडे कंगना रणौत यांनी केलेल्या विधानांची चर्चा होत आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इंदिरा गांधींकडून काय शिकायला मिळालं? यावर केलेलं भाष्य असंच चर्चेत आलं आहे.

कंगना रणौत यांचा इमर्जन्सी हा चित्रपट येत्या ६सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. सध्या जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आणीबाणीवर आधारित हा सिनेमा राजकीय विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर कंगना रणौत यांच्या प्रतिक्रियांचाही अर्थ लावला जात आहे. कंगना रणौत यांनी आजतक वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये या चित्रपटाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

“मी या चित्रपटासाठी खूप मेहनत केली. मला माहिती होतं की यासाठी एवढा वेळ लागणार आहे. मला असं काही द्यायचं होतं की जे फक्त मनोरंजनासाठी नसेल तर आमच्या पीढीसाठी एक ठेवा असेल. आपण नेहमी आणीबाणीबाबत एकतो. आजकाल संविधानावर खूप चर्चा होते. आणीबाणीत संविधानाची हत्या झाली वगैरे बोललं जातं. हे अनेक वर्षांपासून आपण ऐकत आलो आहोत. पण नेमकं माहिती नसतं की तेव्हा काय घडलं होतं”, असं कगना रणौत म्हणाल्या.

“माझ्यासाठी ही मोठी शिकवण”

“एक कलाकार म्हणून माझा हेतू वेगळा होता. आणीबाणी झाली, बेकायदेशीर कृत्य झाली, असंवैधानिक पद्धतीने सगळं घडलं वगैरे समजू शकतं. पण तेव्हा नेमकं काय घडलं? एक एवढी लोकप्रिय नेता… आपल्यापैकी कुणीही आपला गर्व, सत्ता याची शिकार होऊ शकतो, ही माझ्यासाठी इंदिरा गांधींच्या आयुष्याकडून मोठी शिकवण आहे”, असं कंगना रणौत यांनी यावेळी नमूद केलं.

Kangana Ranaut : “..तर कंगना रणौत यांचा शिरच्छेद करु”, धमकीचा व्हिडीओ मेसेज आल्याने खळबळ

“इंदिरा गांधी म्हणजे अशा व्यक्ती आहेत ज्यांचा जेवढा राग झाला, तेवढंच त्यांच्यावर लोकांनी प्रेमही केलं. अभिनव चंडी, दुर्गा वगैरे विशेषणं त्यांना दिली गेली. आज काही लोक मोदींना रामाचा अवतार मानतात. लोक तेव्हा इंदिरा गांधींना दुर्गेचा अवतार मानत होते. त्यामुळे मोदींना रामाचा अवतार माननं हे काही पहिल्यांदा झालेलं नाही. पण एवढं असूनही इंदिरा गांधी देशाच्याच विरोधात गेल्या. हे माझ्यासाठी फार उत्सुकतेचं होतं”, असं इंदिरा गांधींची प्रमुख व्यक्तीरेखा साकारणाऱ्या कंगना रणौत यांनी म्हटलं.

जिडू कृष्णमूर्ती व इंदिरा गांधींचा ‘तो’ संवाद!

“पुपुल जयकर या त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं इंदिरा गांधींचं चरित्र लिहिलं आहे. त्यात इंदिरा गांधींनी त्या काळात त्यांचे गुरू कृष्णमूर्तीं यांच्याशी आणीबाणीबाबत केलेल्या संवादाबाबत सांगितलं आहे. कृष्णमूर्ती इंदिरा गांधींना तेव्हा म्हणाले होते की तुम्ही ही आणीबाणी संपुष्टात आणा. हे फार मोठं पाप तुम्ही करत आहात. तर इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या की मी एका फार क्रूर दानवी राक्षसावर स्वार आहे. आता मला थांबता येणार नाही. मी थांबले तर हा राक्षस मला खाऊन टाकेल. या गोष्टीचा माझ्यावर फार परिणाम झाला. मला वाटलं की इथे अशी एक गोष्ट आहे, जी देशाला, येणाऱ्या पिढीला, आपल्या येणाऱ्या नेत्यांना माहिती व्हायला हवी”, असंही कंगना रणौत यांनी यावेळी नमूद केलं.

Kangana Ranaut-Chirag Paswan: चिराग पासवान यांच्यासोबतचे फोटो चर्चेत; कंगना रणौत म्हणाल्या, “तो माझा चांगला मित्र आहे”!

“लोक चांगलेही असतात आणि वाईटही असतात. एक कलाकार म्हणून मी इंदिरा गांधींनी या देशाला काय दिलंय ते नाकारू शकत नाही”, असंही कंगना रणौत यांनी नमूद केलं आहे.