Kangana Ranaut : भारतीय जनता पक्षाच्या खासदार तथा अभिनेत्री कंगणा रनौत या त्यांच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी अनेकदा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि विरोधकांवर सडकून टीकाही केली आहे. दरम्यान, कंगना रनौत यांनी आता शेतकरी आंदोलनाबाबत एक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे.
कंगना रनौत यांनी नेमकं काय म्हटलं?
कंगना रनौत यांनी नुकताच दैनिक भास्कर या वृत्तवाहिनीली मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत एक विधान केलं आहे. “शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते”, असं त्या म्हणाल्या.
“शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसतं, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती. शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरु होत होतं, ते सर्वांनी बघितली आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला होता”, असेही कंगना रनौत म्हणाल्या.
पुढे बोलताना त्यांनी कोलकातातील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरही भाष्य केलं. “महिला सुरक्षा हा माझ्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. या मुद्द्यावर मी खूप गंभीर आहे. मी अनेकदा महिलांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवला आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
काँग्रेसकडून कारवाईची मागणी
दरम्यान, कंगना रनौत यांच्या या विधानानंतर पंजाबमधील काँग्रेस नेते राजकुमार वेरका यांनी त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. कंगना रनौत यांनी अनेकदा अशाप्रकारे वादग्रस्त विधानं केली आहे. मागेही त्यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. आताही त्यांनी शेतकऱ्यांबाबत विधान केलं आहे. मी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना विनंती करतो त्यांनी कंगना रनौत यांच्यावर गुन्हा नोंदवून राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करावी, असे ते म्हणाले.