नवी दिल्ली : ‘‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना राणावत हिने एका कार्यक्रमात उधळली. त्यावरून कंगना टीकेची धनी ठरली असून, तिच्याकडून पद्मपुरस्कार परत घ्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगनाने हे आक्षेपार्ह विधान केले. या कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याबाबत बोलताना कंगनाने वादग्रस्त विधानांची परंपरा कायम राखत नव्या वादाला तोंड फोडले.

‘‘देशाला १९४७मध्ये मिळाले ते स्वातंत्र्य नव्हते, तर भीक होती. खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’’, असे विधान तिने केले. त्याचे पडसाद गुरुवारी राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर उमटले.  

 भाजप खासदार वरूण गांधी यांनी कंगनाला ट्विटद्वारे लक्ष्य केले. ‘‘कधी महात्मा गांधींच्या त्यागाचा अवमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर आणि आता मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह लाखो स्वातंत्र्यसैनिकांबद्दल तिरस्कार. अशा विचाराला मुर्खपणा म्हणावा की देशद्रोह’’ असे ट्विट वरूण गांधी यांनी केले.

कंगना राणावतला अलिकडेच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसने केली. कंगनाचे विधान हा थेट देशद्रोह ठरतो, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ म्हणाले. ‘अपात्र व्यक्तींना पद्मपुरस्कार दिल्याने असे होते. कंगनाने संपूर्ण देशवासीयांची   माफी मागावी. सरकारने तिच्याकडून पद्मपुरस्कार परत घ्यावा’, अशी   मागणीही गौरव वल्लभ यांनी केली.

कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांनीही कंगनावर टीका केली. समाजमाध्यमांवरही कंगनाविरोधात तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी कंगनाची तुलना भाजप युवा मोर्चाची कार्यकर्ती रूची पाठक हिच्याशी केली. भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्वावर स्वातंत्र्य मिळाल्याचे विधान करून रूची पाठक हिने अलिकडेच वादंग निर्माण केला होता. कंगना या नव्या रूची पाठक आहेत, अशी टीका प्रियंका यांनी केली.

कंगनाच्या या वादग्रस्त विधानानंतर टाळ्या वाजवणारे ते मुर्ख कोण आहेत, हे मला   जाणून घ्यायचे आहे, असे अभिनेत्री स्वरा भास्कर हिने ट्वीटर वरील प्रतिक्रियेत म्हटले आहे.

पोलिसांत तक्रार

कंगना राणावतविरोधात कलम ५०४, ५०५ आणि १२४ अ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.