भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रणौत कायम कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. याआधी अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगना रणौत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. आता कंगना रणौत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्या एका बैठकीत अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्याचं पाहायला मिळालं आहे.
हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातील जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीची (DISHA) एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार निधी विकासकामांसाठी पूर्ण खर्च न केल्यामुळे खासदार कंगना रणौत यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं या बैठकीत पाहायला मिळालं आहे.
नेमकं काय घडलं?
हिमाचल प्रदेशातील मंडी या ठिकाणी उपायुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीची बैठक झाली. या बैठकीत खासदार कंगना रणौत यांनी निधी उपलब्ध असूनही विकासकामांमध्ये झालेल्या विलंबावरून आणि त्यातील अनियमितता यासह आदी मुद्यांवरून अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. या बैठकीत कंगना रणौत या संतप्त झाल्याच्या पाहायला मिळाल्या.
कंगना रणौत यांनी म्हटलं की, “खासदार निधीअंतर्गत सुमारे ११ कोटी रुपये उपलब्ध होते. मात्र, अधिकाऱ्यांनी केवळ ५० लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे मला अशी खोटी आश्वासने देऊ नका. प्रत्येक ‘दिशा’ समितीच्या बैठकीत मला अशीच उत्तरे मिळत आहेत. जेव्हा मी ‘दिशा’ समितीच्या बैठकीत MPLADS निधीबद्दल विचारणा केली, तेव्हा मला सांगण्यात आलं की यात कोणतीही अडचण नाही आणि ९० टक्के निधी खर्च झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात सादर केलेली आकडेवारी प्रत्यक्ष खर्चाशी जुळत नाहीये”, असं कंगना रणौत यांनी म्हटलं.
Mandi, Himachal Pradesh: During the DISHA Committee meeting, BJP MP Kangana Ranaut says, "…Last time as well, when I inquired about MPLADS, and our DISHA committees meet so regularly, whenever I asked about MPLADS, I was told that there was absolutely no hiccup and that 90% of… pic.twitter.com/3pfCD6Kpqb
— IANS (@ians_india) September 5, 2026
‘अभिनयाच्या बाबतीत अधिकारी माझ्यापेक्षाही सरस’
यावेळी कंगना रणौत यांनी खासदार म्हणून आपल्या कामगिरीवरून राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये आपली खिल्ली उडवली जात असल्याचा दावा केला. यावरून अधिकाऱ्यांवर टीका करताना कंगना रणौत यांनी म्हटलं की, “अभिनयाच्या बाबतीत तर अधिकारी माझ्यापेक्षाही सरस आहेत. मंडीमधील लोक प्रलंबित विकासकामांबाबत दररोज रील्स व्हिडीओ बनवत आहेत. मात्र, इकडे अधिकारी आपल्या कार्यालयांमध्ये बसून हसण्यात आणि त्यांना शिव्या देण्यात मग्न आहेत”, अशा शब्दांत कंगना रणौत यांनी संताप व्यक्त केला. तसेच अधिकाऱ्यांना मंडीमधील प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
