लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण झालं नाही. यावरुन आता राजकीय वाद सुरु झाले आहेत. याबाबत भाजपा खासदार मनोज तिवारी आणि खासदार कंगना रणौत या दोघांनीही विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होऊ शकलेलं नाही. संसदेत मागचे तीन दिवस गदारोळ सुरु आहे. आता हा गंभीर आरोप झाला आहे.
कंगना रणौतने काय आरोप केला आहे?
हिमाचलच्या मंडी येथील खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत तसंच अभिनेता आणि खासदार मनोज तिवारी या दोघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला केला जाणार होता असा गंभीर आरोप विरोधकांवर केला आहे. कंगना म्हणाली की पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर द्यायचं होतं पण काँग्रेसच्या खासदारांनी त्यांचा रस्ता अडवला होता. तसंच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा विरोधकांचा कट होता असा आरोप कंगना रणौतने केला आहे.
मनोज तिवारी यांचा आरोप काय?
मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे की विरोधी पक्षांनी हे वातावरण तयार केलं होतं की पंतप्रधान येऊ नयेत. ७ ते ८ महिला खासदारांना पुढे करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला. त्यामुळे पंतप्रधान संसदेत आले नाहीत आणि त्यांनी अभिभाषणावर उत्तर दिलं नाही असं मनोज तिवारींनी सांगितलं आहे.
२२ वर्षांमध्येच असं पहिल्यांदाच घडलं आहे
लोकसभा सचिवालयातील सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या २२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर भाषण केले नाही. काँग्रेस पक्ष लोकसभेत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याचा प्रयत्न करणार होता, तशी योजना तयार केली जात होती. त्यासाठी महिला खासदारांना ढाल म्हणून पुढे पाठवण्यात आले होते, असा दावा केला जातोय. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर कोणतेही भाषण केले नाही. त्यानंतर सभागृहातील गोंधळ लक्षात घेता लोकसभेच्या अध्यक्षांनी कामकाज स्थगित केले.
मोदी एपस्टीन फाईल्सला घाबरले आहेत का?
दुसरीकडे काँग्रेसने मात्र हा दावा फेटाळला आहे. आम्ही फक्त बॅनर घेऊन गेलो होतो. भाजपाकडून खोटा दावा केला जात आहे, असे काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. तसेच मोदी एपस्टीन फाईल्सला घाबरले आहेत का? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

