हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील ग्राहक आयोगाने एका व्यक्तीला ज्वेलर्सच्या फसवणुकीपासून दिलासा दिला आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ नवीन सोन्याच्या कड्यांची प्रतीक्षा करावी लागल्याच्या प्रकरणात ज्वेलर्सला ग्राहक आयोगाने दणका दिला. जुन्या सोन्याच्या कड्यांऐवजी नवीन कडे बनवून देण्याचे आश्वासन देऊनही सोने परत न केल्याप्रकरणी आयोगाने संबंधित ज्वेलर्सला ३२ ग्रॅम सोने परत करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय ग्राहकाला झालेल्या त्रासापोटी २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई आणि १० हजार रुपये खटल्याचा खर्च, अशी एकूण ३५ हजार रुपयांची भरपाई देण्याचेही निर्देश दिले आहेत.

३२ ग्रॅम सोन्यापासून ४० ग्रॅमचे नवे कडे बनवण्याचे आश्वासन

कांगडा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर राज कुमार यांनी मोहित कपूर, मीना कुमारी आणि ओम प्रकाश यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. हे तिघेही पालमपूरजवळील पापरोळा येथील कपूर ज्वेलर्सशी संबंधित होते.

तक्रारीनुसार, १ सप्टेंबर २०२३ रोजी राज कुमार यांनी दोन जुन्या सोन्याच्या कड्या ज्वेलर्सकडे दिल्या होत्या. त्याचे वजन ३२ ग्रॅम होते. हे सोने वितळवून आधुनिक डिझाइनचे ४० ग्रॅम वजनाचे नवीन कडे बनवून देण्याचे ठरले होते. ज्वेलर्सने दोन महिन्यांत नवीन कडे तयार करून देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा ग्राहकाने केला.

दोन वर्षे झाली, तरी ना कडे मिळाले ना सोने

दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही नवीन कडे मिळाले नाहीत. राज कुमार यांनी ज्वेलर्सच्या अनेकदा चकरा मारल्या. मात्र प्रत्येक वेळी काम लांबणीवर टाकण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, ज्वेलर्सचे मालक संजय कपूर यांचा २०२४ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मुलगा मोहित कपूर आणि पत्नी मीना कुमारी यांनी व्यवसायाची जबाबदारी घेतली. संजय यांचा भाऊ ओम प्रकाश यांचाही या प्रकरणात समावेश करून घेतला. राज कुमार यांनी त्यानंतर नवीन कडे बनवून देण्याची किंवा त्यांचे मूळ ३२ ग्रॅम सोने परत करण्याची मागणी केली. मात्र, २९ सप्टेंबर २०२५ रोजी सोने किंवा नवीन कडे देण्यास नकार देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

ज्वेलर्सने सोने मिळाल्याचेच नाकारले

मोहित कपूर आणि मीना कुमारी यांनी ग्राहकाची तक्रार फेटाळून लावत त्यांच्यात असा कोणताही व्यवहार झालाच नसल्याचा दावा केला. राज कुमार यांच्याकडून कोणतेही सोने घेतले नाही, तसेच कोणतीही पावती किंवा अंदाजपत्रक दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. ओम प्रकाश यांनीही कपूर ज्वेलर्सच्या व्यवसायाशी आपला संबंध नसल्याचे सांगितले. आपण बंजरमध्ये १९९३ पासून हिमाचल खादी मंडळात कार्यरत असल्याचा दावा करत त्यांनी राज कुमार यांनी खोटी कहाणी रचून सोने आणि पैसे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

ग्राहकाने सादर केली पावती

राज कुमार यांनी आयोगासमोर व्यवहाराची पावती सादर केली. पुराव्यांची तपासणी केल्यानंतर आयोगाने १ सप्टेंबर २०२३ रोजी ३२ ग्रॅम सोने कपूर ज्वेलर्सकडे देण्यात आल्याचे मान्य केले. ग्राहकाने सादर केलेल्या दस्तऐवजी पुराव्यामुळे मोहित आणि मीना यांचा बचाव टिकत नसल्याचे आयोगाने नमूद केले. संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर व्यवसायाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे त्यांच्या कायदेशीर वारसांवरही जबाबदारी येते, असे आयोगाने स्पष्ट केले. ओम प्रकाश यांचा व्यवसायाशी संबंध नसल्याचा बचावही आयोगाने फेटाळला.

ग्राहकाचे सोने जवळ ठेवून त्याबदल्यात आश्वासन दिलेले दागिने न देणे किंवा मूळ सोने परत न करणे ही सेवेत गंभीर त्रुटी आणि अनुचित व्यापार पद्धत आहे, असे आयोगाने ३ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात म्हटले. कपूर ज्वेलर्सविरोधात अशाच प्रकारच्या इतर तक्रारीही प्रलंबित किंवा निकाली निघाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. त्यामुळे हे प्रकरण केवळ एकट्या व्यवहारापुरते मर्यादित नसल्याचेही आयोगाने नमूद केले.

६० दिवसांत सोने परत करण्याचे आदेश

आदेशाची प्रत मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत ३२ ग्रॅम सोने परत करण्याचे आदेश सर्व प्रतिवादींना संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे देण्यात आले. तसेच, त्यांना राज कुमार यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी नुकसानभरपाई म्हणून २५ हजार रुपये आणि खटल्याचा खर्च म्हणून १० हजार रुपये देण्याचेही निर्देश देण्यात आले.

ग्राहकांनी व्यवहाराची पावती जपून ठेवावी

दागिने पुन्हा घडवण्यासाठी किंवा नवीन दागिने बनवण्यासाठी सोनाराकडे सोने सोपवताना, ग्राहकांनी व्यवहाराचा तपशील आणि सोन्याचे वजन स्पष्टपणे नमूद केलेली पावती घेण्याचा आग्रह धरावा आणि यासंदर्भातील सर्व पत्रव्यवहार जपून ठेवावा.