क्रांतिकारकांचा अपमान केल्याची भाजपची टीका; काँग्रेसचीही नाराजी

जेएनयू विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमार याची तुलना क्रांतिकारक भगतसिंग यांच्याशी करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

जेएनयूमध्ये रविवारी रात्री विद्यार्थ्यांच्या एका गटासमोर बोलताना थरूर यांनी, भगतसिंग हे त्यांच्या काळातील कन्हैयाकुमार होते, असे वक्तव्य केले. ब्रिटिश राजवटीत देशद्रोहाचे सर्वात मोठे बळी जवाहरला नेहरू, म. गांधीजी, लोकमान्य टिळक आणि अ‍ॅनी बेझंट हे होते, असेही ते म्हणाले. या वेळी एका विद्यार्थिनीने भगतसिंग यांचा उल्लेख केला तेव्हा थरूर म्हणाले की, भगतसिंग हे त्यांच्या काळातील कन्हैयाकुमार होते.

थरूर यांच्या वक्तव्यावर भाजपने सडकून टीका केली आहे, थरूर यांच्या वक्तव्यामुळे थोर देशभक्त क्रांतिकारक भगतसिंग यांचा आणि अन्य देशभक्तांचा अपमान झाला आहे.  जर कन्हैयाकुमार हे भगतसिंग असतील तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी कोण आहेत हे थरूर यांनी सांगावे, असे भाजपचे नेते शहानवाझ हुसेन यांनी याबाबत  म्हटले आहे.

या बाबत काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी विचारले असता त्यांनी, भगतसिंग केवळ एकच झाले असे उत्तर दिले आणि थरूर यांच्या विधानाशी असहमती सूचित केली. थरूर यांनी मात्र  तुलना करण्याचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले.

हा लोकांचा अधिकार

भारत माता की जय म्हणण्यावरून आता राष्ट्रवाद ठरवला जात आहे पण त्यात काही अर्थ नाही, जे योग्य वाटेल, ज्यावर त्यांचा विश्वास असेल तेच निवडण्याचा लोकांना अधिकार आहे, लोकशाहीत इतर विचारधारा नाकारून चालत नाही, त्याबाबत सहिष्णु असावे लागते, असेही थरूर यांनी सांगितले.