कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार तसंच गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

पुढील वर्षी भाजपशासित गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेला हा पक्षप्रवेश राजकारणात काय बदल घडवून आणतो हे पाहण्यासारखे असेल.

कन्हैय्या कुमार २०२१ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) मध्ये सामील झाले होते आणि बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातून भाजपाचे गिरीराज सिंह यांच्या हातून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

राष्ट्रीय दलित अधिकार मंच (आरडीएएम) चे संयोजक मेवानी यांनी 2017 मध्ये गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम विधानसभेची जागा काँग्रेसच्या पाठिंब्याने जिंकली होती.आजच्या सुरुवातीला, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘तुकडे तुकडे गँग’शी हातमिळवणी केल्याबद्दल काँग्रेसवर निशाणा साधला.