अवघ्या काही दिवसांपूर्वी कन्हैय्या कुमारनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या विषयाची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असताना आता कन्हैय्या कुमारवर पक्षानं मोठी जबाबदारी सोपवली आहे. हिमाचल प्रदेशमधील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कन्हैय्या कुमार आणि नवजोत सिंग सिद्धू यांची देखील नावं आहेत. त्यासोबतच, सचिन पायलट यांचं नाव देखील या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केली आहे.

काँग्रेसनं आज एकूण २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत लोकसभेची एक जागा आणि विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी मतदान ३० ऑक्टोबर रोजी तर मतमोजणी आणि निकाल २ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.

काँग्रेस पक्षानं जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये कन्हैय्या कुमार आणि नवजोत सिंग सिद्धू यांच्यासोबतच सचिन पायलट, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, भूपिंदर हुड्डा, आनंद शर्मा, राजीव शुक्ला यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये प्रचंड वाद झालेले नवजोत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे हिमाचल प्रदेशमध्ये मात्र काँग्रेससाठी एकत्र प्रचार करताना दिसणार आहेत.