इंडिगोच्या विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या पत्रकारितेच्या पद्धतीवर टीका करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर इंडिगोसह चार विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे. कुणाल कामराचा अर्णब गोस्वामींना पत्रकारितेच्या पद्धतीबाबत जाब विचारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. कुणाल कामरावरील बंदीवर सोशल मीडियामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी कुणाल कामराचं समर्थन केलंय तर काहींनी त्याच्यावरील बंदी योग्य असल्याचं म्हटलंय. दरम्यान यावरुन जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेते कन्हैय्या कुमार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वप्रथम इंडिगोने कुणालवर सहा महिन्यांची बंदी घातली. त्यानंतर केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीप सिंग सुरी यांनी कुणाल कामरावर अन्य विमान कंपन्यांनीही कारवाई करण्याची सूचना केली. त्यावर अन्य तीन कंपन्यांनीही कामरावर बंदी घातली. यावरुन कन्हैय्या कुमारने संताप व्यक्त केला आहे. “सहकारी कुणाल कामरावर कारवाई करुन सरकारने दोन संदेश दिले आहेत. जर तुम्ही शाह आणि शहेनशहा यांची तळी उचलणार असाल तर तुम्हाला कोणत्याही गुन्ह्यातून सरकार सहज वाचवेल. पण, जर तुम्ही त्यांच्या कारभाराचं सत्य जगासमोर आणत असाल तर कायदा धाब्यावर बसवून, सर्व नियम पायदळी तुडवून तुमच्यावर विमान प्रवासाचीच काय श्वास घेण्याचीही बंदी घातली जाईल” अशा आशयाची टीका कन्हैय्याने ट्विटरद्वारे केली आहे. शाह आणि शहेनशहा म्हणत कन्हैय्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केलाय.

 काय आहे प्रकरण –
मुंबईहून लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 5317 या विमानाने कॉमेडियन कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी 28 जानेवारी रोजी प्रवास करत होते. कुणाल कामराने या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण केलं आणि सोशल मीडियावर पोस्ट केलं. व्हिडिओत कुणाल कामरा हा गोस्वामी यांच्या पत्रकारितेवर टीका करताना “गोस्वामी भित्रट आहे असं म्हणताना दिसतोय. त्यासोबत कुणालने निवेदनही जारी केलं आहे. त्यामध्ये मला काहीही पश्चात्ताप नाही आणि मी माफी मागणार नाही असं त्याने स्पष्ट केलंय. आपल्या निवेदनात त्याने, “मी आज लखनौला जाणाऱ्या विमानात अर्णब गोस्वामी यांना भेटलो. त्यांना बोलण्याची मी विनंती केली पण त्यांनी फोनवर बोलत असल्याचं भासवलं आणि मी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी सीटबेल्टचा संकेत बंद होता. नंतर सीटबेल्ट लावण्यास सांगण्यात आलं आणि एअरलाईन कर्मचाऱ्याने मला जागेवर जाण्यास सांगितलं. त्यानंतर टेक ऑफ झाल्यावर मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो आणि बोलण्याची विनंती केली. पण आपण काहीतरी पाहत असल्याचं सांगत त्यांनी मला टाळलं. मी वारंवार विनंती केली. नंतर मला त्यांच्या पत्रकारितेबद्दल काय वाटतं याबद्दल एक स्वगत सादर केलं. माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. ‘रिपब्लिक टीव्ही’चे लोक प्रेक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबर जे करतात तेच मी केलं. आत्महत्या केलेल्या रोहित वेमुल्लासाठी आणि त्याच्या आईसाठी मी हे करतोय. त्याच्या जातीबाबत तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये चर्चा करत होतात. मी हे करतोय, मला त्याबद्दल काहीही पश्चात्ताप नाही आणि मी माफी मागणार नाही. असं कामराने एका निवेदनात म्हटलं. यानंतर केलेल्या ट्विटमध्ये हे सर्व मी माझ्या हिरोसाठी केलं आहे. रोहित वेमुल्लासाठी केलं आहे, असं कुणालने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. मी वैयक्तिकरित्या सर्व क्रू मेंबर्सची माफी मागितली. मला नाही वाटत मी कोणताही गुन्हा केला आहे. मी हे सर्व रोहित वेमुल्लासाठी केलं. मी एक व्यक्ती सोडून सर्वाची माफी मागितली,”असंही त्यानं नमूद केलं.