कन्नड अभिनेता ध्रुव शर्मा यांचे निधन झाले आहे. ते ३७ वर्षांचे होते. शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. बंगळुरु येथील एका खासगी रुग्णालयात ध्रुव यांनी काल सकाळी अखेरचा श्वास घेतला. सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये फलंदाजीच्या अनोख्या शैलीमुळे ध्रुव शर्मा प्रकाशझोतात आले होते. ‘कर्नाटका बुल्डोझर्स’ या संघातील त्याच्या कामगिरीमुळे प्रेक्षकांनीही त्यांची प्रशंसा केली होती.

ध्रुवच्या जाण्याने सध्या कलाविश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनाच त्यांच्या या आकस्मिक निधनाने धक्का बसला आहे. ध्रुव यांना एखादा गंभीर आजार असेल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. काही दिवसांपूर्वी राहत्या घरी घसरून पडल्यानंतर त्यांना कोलंबिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासूनच त्याची प्रकृती सातत्याने खालावत गेली. ध्रुव हे उद्योगपती व अभिनेता सुरेश शर्मा यांचे पूत्र होते. २००६ मध्ये त्याने ‘शेशांजली’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक कलाकारांनी ट्विट करून त्याला श्रद्धांजली दिली. रितेश देशमुख, प्रियमणी, विक्रांत संतोष, आफताब शिवदासानी, हंसिका पुनाचा या कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं आहे.