केरळमधील कन्नूर जिल्ह्यात भारतीय नौदल अकादमीत तात्पुरता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. ३२ वर्षीय विप्लव सोरेन याला पय्यन्नूर पोलिसांनी अटक केली असून, गेल्या चार दिवसांत कन्नूरमध्ये बांगलादेशी नागरिकांच्या अटकेची संख्या सहावर पोहोचली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोरेन हा पय्यन्नूरजवळील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीत सुमारे वर्षभरापासून तात्पुरता कर्मचारी म्हणून काम करत होता. याबद्दल सविस्तर वृत्तात टुडेने दिले आहे.
नौदल अकादमीतूनच अटक
पय्यन्नूर सर्कल इन्स्पेक्टर महेश के. नायर यांच्या निर्देशानुसार पोलिस उपनिरीक्षक शुहैब यांनी सोरेनला नौदल अकादमीच्या परिसरातून अटक केली. कन्नूर पोलिस अधिकारी उमेश गोयल यांनी सांगितले की, “विप्लव सोरेन हे त्याचे खरे नाव आहे की नाही, याची अद्याप चौकशी झालेली नाही. त्याला ताब्यात घेऊन तपास करण्यात येईल.”
अकादमीत नेमके कोणते काम करत होता?
सोरेन भारतीय नौदल अकादमीत नेमके कोणते काम करत होता, याची माहिती पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाही. तसेच त्याला तेथे नोकरी कशी मिळाली, याचाही तपास सुरू आहे. त्याची अकादमीतील उपस्थिती सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय होती का, याबाबतही पोलिसांनी सध्या कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही.
चार दिवसांत ६ बांगलादेशी नागरिकांना अटक
सोरेनच्या अटकेपूर्वी कन्नूर पोलिसांनी गेल्या चार दिवसांत पाच बांगलादेशी महिलांना भारतात वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. गुरुवारी कन्नूर शहरातील एका स्पामध्ये काम करणाऱ्या चार महिलांना अटक करण्यात आली. त्यांची नावे नाजमा अख्तर (४०), तस्लीमा खातून (२५), मोयना खातून (२९) आणि नसरी बीभी (२८) अशी आहेत. यापूर्वी मंगळवारी आणखी एका बांगलादेशी महिलेला भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.
भाड्याच्या घरावर छापा
पोलिसांना ओडेनपरंबू येथील एका भाड्याच्या घरात बेकायदेशीर स्थलांतरित राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर न्यायालयाकडून शोध वॉरंट घेऊन पोलिसांनी या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान महिलांकडून बांगलादेशी ओळखपत्रे तसेच बनावट भारतीय ओळखपत्रे सापडल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
आसाममधून बनावट कागदपत्रे
पोलिसांच्या चौकशीत या महिलांनी कामासाठी केरळमध्ये येण्यापूर्वी आसाममधून बनावट भारतीय कागदपत्रे मिळवल्याचे सांगितल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या महिला गेल्या काही महिन्यांपासून कन्नूर शहरातील एका स्पामध्ये काम करत होत्या. चारही महिलांविरोधात स्थलांतर आणि परदेशी नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय नौदल अकादमीत काम करणाऱ्या विप्लव सोरेनच्या प्रकरणात त्याची ओळख, भारतात वास्तव्याची कागदपत्रे आणि अकादमीत त्याला मिळालेली नोकरी याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.
