रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी पुढे आलेल्या एका बहिणीबरोबर दुःखद घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये बंद पडलेल्या बोअरवेलवर टाकलेली माती अचानक खचल्याने २० फूट खोल बोअरवेलमध्ये एका १६ वर्षीय मुलगी पडली. बचाव पथकांनी तिला बाहेर काढले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही घटना शुक्रवारी सकाळी पुरवामीर गावात घडली. चुटकी शर्मा असे मृत मुलीचे नाव आहे. रक्षाबंधनानिमित्त ती अंगणात भावाबरोबर बसली होती. भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी ती पुढे झाली आणि त्याच क्षणी तिच्या पायाखालील जमीन अचानक खचली. याबद्दल सविस्तर वृत्त द प्रिंटने दिले आहे.
२० फूट खोल बोअरवेलमध्ये पडली
पोलिस आयुक्त रघुबीर लाल यांनी सांगितले की, बंद असलेल्या २० फूट खोल बोअरवेलमध्ये मृत मुलगी पडली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले.
मुलीपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांनी बोअरवेलच्या शेजारी जेसीबीच्या मदतीने समांतर खड्डा खोदला. सुमारे ६० जवान आणि कर्मचाऱ्यांनी या बचाव मोहिमेत सहभाग घेतला. मात्र, घटनास्थळावरील जमीन अस्थिर असल्याने बचावकार्य अत्यंत सावधपणे करावे लागले. आणखी जमीन खचण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्खनन यंत्रांचा काळजीपूर्वक वापर करण्यात आला. घराच्या स्थितीवरही सतत लक्ष ठेवण्यात आले.
तीन वर्षांपूर्वी बोअरवेल पाडला
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घराच्या अंगणात सुमारे तीन वर्षांपूर्वी बोअरवेल पाडण्यात आली. मात्र, काम पूर्ण न झाल्याने ती बंद पडली. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आणखी एक बोअरवेल पाडण्यात आली. अलीकडे झालेल्या पावसामुळे बंद बोअरवेलभोवतीची जमीन कमकुवत झाली असावी आणि त्यामुळे ती अचानक खचली, असे कुटुंबीयांनी सांगितले.

अखेर बचाव पथकांनी मुलीला बोअरवेलमधून बाहेर काढले आणि सरसौल प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रक्षाबंधनाच्या आनंदाच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली.
