Kanpur Vineet Minocha Murder Case: कानपूरमधील नामांकित औषध व्यावसायिक विनीत मिनोचा (वय ६३) यांच्या हत्या प्रकरणाला पुन्हा नवे वळण मिळाले आहे. ५ सप्टेंबर रोजी व्यावसायिक विनीत मिनोचा यांची राहत्या घरात हत्या झाली होती. त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच दोन मारेकऱ्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून मिनोचा यांची सून शालूनेच हा खून करण्यासाठी मारेकऱ्यांना पाठवल्याचे समोर आले होते. मात्र आता या प्रकरणात विनीत यांचा मुलगा सुब्रत मिनोचा (वय ३२) याचा हात असल्याचे समोर आले आहे. सुब्रत मिनोचा याने दिलेल्या ताज्या जबाबात म्हटले की, वडिलांच्या हत्येसाठी तोच जबाबदार असून त्याने मारेकऱ्यांना पत्नीवर आळ टाकण्यास सांगितले होते.
बुधवारी सुब्रत मिनोचाला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली. सुब्रतची पत्नी शालू आणि मारेकरी विशाल गौतम यांच्या ताज्या चौकशीनंतर सुब्रतने कबुलीजबाब दिला. मात्र तरीही पोलिसांनी अद्याप शालूला निर्दोष ठरवलेले नाही. या हत्येमध्ये तिच्या कथित भूमिकेचा तपास सुरू आहे.
यापूर्वी मारेकरी विशाल गौतमने दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक विनीत यांची हत्या करण्यासाठी शालूने त्यांना ६ लाख रुपयांमध्ये सुपारी दिली होती. यानंतर सून शालूला अटक करण्यात आली होती. सुब्रत मिनोचानेही या हत्येच्या कटाबाबत कोणतीही माहिती नसून शालूवरच दोषारोप केला होता. मात्र तपास पुढे गेल्यानंतर सुब्रतने हत्येची जबाबदारी स्वीकारली असून स्वतःवर आळ घेतला.
पोलीस आयुक्त रघुबीर लाल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, विशाल गौतमने पोलिसांना सांगितले की, सुब्रतने वडिलांच्या हत्येसाठी सहा लाख रुपये देण्याचे वचन दिले होते. तसेच हत्येनंतर पकडले गेल्यास शालूवर नाव घेण्यासही सुब्रतने सांगितले होते. पोलीस आता सुब्रत, शालू आणि विशाल यांच्या जबाबांची तुलना कॉल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फुटेज आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे करत आहेत.

सुब्रतकडून जबाबात बदल
इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, विनीत मिनोचा यांच्या हत्येचा कट फसल्यानंतर सुब्रत सुरुवातीला पत्नीवर दोष टाकत होता. मात्र चौकशी जसजशी पुढे सरकली आणि कारवाईचा फास आपल्या गळ्याशी येत असल्याची खात्री पटल्यानंतर त्याने जबाबात बदल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गौतमने सुरुवातीलाच शालूचे नाव घेतल्यामुळे सुब्रतची अटक टळली होती. त्यामुळे तपासाची पुढची दिशा काय असेल, याबद्दल त्याला संभ्रम होता. सुब्रतने आता चौकशीत असेही सांगितले की, शालू या प्रकरणात अडकल्यामुळे त्याला अपराधीपणाची भावना वाटत होती. त्यामुळे त्याने खुनाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला.
मालमत्ता आणि कर्जाचा डोंगर
मालमत्तेच्या वादातून विनीत मिनोचा यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशालच्या जबाबानुसार, सुब्रतला भीती होती की, वडील विनीत हे त्यांची मालमत्ता एका महिलेच्या नावावर करणार आहेत. या महिलेबरोबर विनीत यांचे कथित संबंध होते. तसेच सुब्रतवर २० लाख रुपयांपेक्षा अधिकचे कर्ज होते. या आर्थिक बोज्यातून हत्येचा कट रचला गेला का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
५ सप्टेंबर रोजी काय घडले?
कल्याणपूर परिसरातील उच्चभ्रू ‘रतन ऑर्बिट’ सोसायटीत राहणारे विनीत मिनोचा यांचा बिरहाना मार्गावर औषधांचा घाऊक आणि किरकोळ व्यवसाय आहे. ५ सप्टेंबरच्या रात्री त्यांचा मुलगा सुब्रत (वय ३२), सून शालू आणि पाच वर्षांचा नातू टिळक नगरमधील एका लाऊंजमध्ये रात्री ९.३५ वाजता ‘किट्टी पार्टी’साठी गेले होते. रात्री पावणेअकराच्या सुमारास विनीत घरी परतले. जेवण आटोपून झोपायला जात असताना त्यांना मुलाच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. त्यांनी आत डोकावून पाहिले असता दोन अनोळखी तरुण उभे असल्याचे आढळले. विनीत यांनी खोलीतील लाईट लावताच दोघांपैकी एका व्यक्तीला त्यांनी तात्काळ ओळखले. ते काही बोलणार इतक्यात त्या दोघांनी त्यांच्यावर चाकूने तब्बल २६ वार केले आणि पळ काढला.
