Kanpur crime latest updates on IAS officer son : चालत्या गाडीत झालेल्या वादातून एका महिलेला तिच्या प्रियकराने जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कानपरूमधील बिठूरमध्ये ब्रह्मवर्त घाटाकडे जाताना हा प्रकार घडला. या घटनेत ३८ वर्षीय महिलेला जखम झाली असून प्रियकराने पोलिसांना धमकावल्याचाही प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवाशिष निगम (३८) याने आयआयटी-कानपूरमध्ये कार्यरत असलेल्या महिलेला फोन करून मुख्य गेटवर बोलावून घेतलं. त्यानंतर तिला कारमध्ये बसवलं. दोघेही बिठूरमधील ब्रह्मावर्त घाटाकडे जात असताना कारमध्ये त्यांच्यात वाद झाला. वाद वाढल्याने देवाशिषने मंधना जवळील सर्व्हिस लेनवर कार थांबवली, तो खाली उतरला आणि त्याने रस्त्याच्या कडेला पडलेली वीट उचलली.

महिला गंभीर जखमी

महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, आरोपीला पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांना माहिती दिली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपीने पोलिसांनाही धमकावलं.

“माझी आई निवृत्त आयएएस (IAS) अधिकारी आहे”, असा दावा केला. डीसीपी (पश्चिम) एस. एम. कासिम आबिदी यांनी सांगितलं की, पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला जात आहे. “या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाजूंची तपासणी केली जात आहे”, असं डीसीपींनी स्पष्ट केले.