Russia-Ukraine War : गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सरू आहे. या युद्धात आतापर्यंत शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी मागच्या चार वर्षांत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या युद्धाचा जगातील अनेक देशांवर गंभीर परिणाम होत आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून भारतीय तरुणांचा युक्रेनविरोधात वापर होत असल्याचा दावा याआधी अनेकदा केला गेला. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

भारतातील कानपूरमधील एका इंजिनिअरच्या पत्नीने तिच्या पतीला रशियन सैन्यात सामील होण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. या संदर्भात तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तिने धक्कादायक दावे केले आहेत.

इंजिनिअरच्या पत्नीने काय दावा केला?

कानपूरमधील एक इंजिनिअरच्या पत्नीने मोठा दावा केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीला मॉस्कोमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि रशियन सैन्यात सामील होण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जात आहे. या मुद्यावरून या महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

वृत्तानुसार, व्हायरल व्हिडीओमध्ये ही महिला तिचं नाव स्नेहा गुप्ता असं सांगत असून तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने दावा केला की, तिचे पती चंदन गुप्ता यांना रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास मॉस्को पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार, ते उत्तर प्रदेशातील कानपूरचे मूळ रहिवासी आहेत. मात्र, तिचे पती चंदन गुप्ता हे इंजिनिअर म्हणून रशियात काम करतात. ते नोएडाच्या सेक्टर ६२ मधील एका कंपनीशी संबंधित असून कामासाठी वर्क व्हिसावर त्यांना रशियाला पाठवण्यात आलेलं आहे.

रशियन सैन्यात सामील होण्यासाठी दबाव आणल्याचा दावा

या महिलेने या व्हिडीओत दावा केला आहे की, तिच्या पतीने कोणताही गैरप्रकार केलेला नाही. मात्र, तरीही त्याला मॉस्को पोलिसांनी ताब्यात घेऊन तुरुंगात टाकलं आहे.ताब्यात घेतल्यानंतर रशियन सैन्यात सामील होण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जात आहे. या महिलेने म्हटलं की, रशियन सैन्यात जवानांची कमतरता आहे. त्यामुळे भारतीयांसह परदेशी नागरिकांना देशाच्या सशस्त्र दलात भरती करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची मागणी

या व्हिडीओच्या शेवटी स्नेहा या महिलेने केंद्र सरकारकडे मदत करण्याची मागणी केली आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला अतिशय भावूक झालेली दिसत आहे. तसेच तिने म्हटलं की, तिला रशियन भाषा समजत नाही आणि त्यामुळे तिच्या पतीसोबत नेमकं काय घडतंय हे तिला समजत नाहीये.

अधिकृत पुष्टी नाही

दरम्यान, या महिलेने केलेल्या दाव्याबाबत रशिया किंवा भारत सरकारची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच पतीच्या अटकेच्या परिस्थितीबद्दल किंवा पतीवरील आरोपांबद्दल किंवा त्याला रशियन सैन्यात भरती करण्यासाठी कोणती औपचारिक प्रक्रिया सुरू झाली आहे का? या संपूर्ण घटनेची सध्या कोणतीही स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.