Kanpur Lamborghini accident shivam mishra bail: कानपूर लॅम्बोर्गिनी अपघातप्रकरणातील तंबाखू व्यावसायिक केके मिश्रा यांचा मुलगा शिवम मिश्रा याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. चालक असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने आत्मसमर्पण करण्याची तयारी दर्शवली होती न्यायालयाने ही विनंती फेटाळल्यानंतर शिवमला आज (१२ फेब्रुवारी) सकाळी अटक करण्यात आली. दरम्यान, न्यायालयाने शिवमला २० हजार रुपयांची हमी आणि २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. कानपूर येथे लॅम्बोर्गिनी अपघातात सहा जण जखमी झाले होते.

व्हीआयपी रोडवर अपघात, सहा जखमी

कानपूरच्या व्हीआयपी रोडवर ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या लॅम्बोर्गिनीच्या अपघातात सहा जण जखमी झाले होते. यानंतर व्यावसायिकाच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होऊ लागला. जनतेच्या वाढत्या रोषानंतर गुरुवारी सकाळी (१२ फेब्रुवारी) शिवमला आर्य नगर निवासस्थानाबाहेरून अटक करण्यात आली. यानंतर त्याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (AJCM) न्यायालयात हजर करण्यात आले होते.

शिवमचे वकील काय म्हणाले?

“शिवम मिश्राला करण्यात आलेली अटक सर्वोच्च न्यायालय आणि बीएनएसएसचे उल्लंघन आहे. पोलिसांना अटकेचे कारण स्पष्ट करता आले नाही. न्यायालयाने अनेक प्रश्न विचारले पण, तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांना बाजू मांडता आली नाही. शिवमची २० हजार रुपये हमी आणि २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली आहे”, अशी माहिती शिवम मिश्री यांचे वकील नरेश चंद्रा त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अटक बेकायदेशीर

“पोलिसांनी शिवम मिश्राला न्यायालयासमोर हजर करत १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावत अटक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले”, अशी माहिती त्रिपाठी यांनी दिली. तसेच, पोलिस सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्रिपाठी यांनी केला.

अपघातात प्रकरणात ट्विस्ट

बुधवारी या अपघात प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आला. मिश्रा यांच्या घरातील चालक मोहन याने कानपूर कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. मिश्रा यांचे वकील नरेंद्र कुमार यादव यांनी, अपघात झाला त्यावेळी मोहन कार चालवत होता असे कोर्टाला सांगितले. ‘शिवमला चक्कर आली आणि घाबरलो त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला’, असे मोहनने कोर्टाला सांगितले. दरम्यान, तपास अधिकारी दीनेश सिंग यांनी १० प्रत्यक्षदर्शींची जबाब नोंदवले. यात सर्वांनी शिवमच कार चालवत होता, असे सांगितले. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये दुसरे कोणी नव्हते, बाऊन्सर्सनी शिवमला बाहेर काढले, असे सांगितले.