Kanpur Murder News: दिल्लीत गोंगाटाला आक्षेप घेतल्यानंतर जमावाने मणिपुरी संगीतकाराची हत्याचे केल्याचे प्रकरण ताजे असताना, रस्त्यावर लघुशंका करण्यास विरोध केल्यामुळे तरुणांच्या टोळक्याने ४७ वर्षीय व्यक्तीला जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही घटना घडली. अमित कुमार असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रस्त्याच्या मध्येच लघुशंका करण्यास विरोध केल्याने मारहाण

अमित कुमार यांनी रस्त्याच्या मध्येच लघुशंका करणाऱ्या एका व्यक्तीला आक्षेप घेतला होता. त्यानंतर मद्याच्या धुंदीत असलेल्या काही तरुणांच्या टोळक्याने त्यांना वेढले आणि मारहाण केली. संशयितांनी कुमार यांच्या डोक्यात विटेने घाव केले, यात ते गंभीर जखमी झाले. कुमार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस उपचारांनंतर सोमवारी उशिरा संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला, असे एएनआय य वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

उपचारादरम्यान मृत्यू

संपूर्ण घटना घटनास्थळाजवळ असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेबाबत पोलीस उपआयुक्त अतुल श्रीवास्तव यांनी एएनआयला माहिती दिली आहे. ५ सप्टेंबरच्या रात्री उशिरा अमित कुमार नावाच्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना अपघातात दुखापत झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. अमित कुमार यांचा ७ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि स्थानिक स्तरावर चौकशी सुरू केली,” असे श्रीवास्तव म्हणाले.

आरोपींना पकडण्यासाठी चार पथकं तयार

“सखोल चौकशीतून असे समोर आले आहे की त्यांचा काही व्यक्तींशी वाद झाला होता. या घटनेदरम्यान त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यातूनच झालेल्या दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला,” असे श्रीवास्तव यांनी एएनआयला सांगितले. “या माहितीच्या आधारे काकादेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी देखील करण्यात आली. पैकी चार संशयितांना कसून चौकशी सुरु आहे. आरोपींना पकडण्यासाठी चार पथकं तयार करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरच अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे श्रीवास्तव यांनी सांगितले.