Emotional suicide note of Vaishnavi Shukla from Kanpur: उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील २८ वर्षीय विवाहितेने दुर्धर आजाराला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तिने सुसाइड नोटमध्ये भावनिक मजकूर लिहिला आहे. विवाहिता जेव्हा आत्महत्या करते, तेव्हा सासरच्या मंडळींना दोष दिला जातो. हुंडा किंवा इतर त्रासामुळे आत्महत्या करण्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. मात्र कानपूरमधील घटना अपवाद ठरते. या विवाहितेने सुसाइड नोटमध्ये पती आणि सासरच्या नातेवाईकांचे कौतुक केले आहे.
दुर्धर आजारामुळे टोकाचा निर्णय
महिलेचे नाव निक्की उर्फ वैष्णवी असून ती दीर्घकाळापासून पाठीच्या कण्याच्या आजाराने त्रस्त होती. तीन वर्षांपूर्वी शिवम शुक्ला नावाच्या व्यक्तीचे तिचे लग्न झाले होते. पाठीच्या कण्याच्या आजारामुळे तिच्यावर कानपूर आणि दिल्ली येथे उपचार सुरू होते, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.
निक्कीने एक हस्तलिखित चिठ्ठी मागे सोडली आहे. “आयुष्यभर तुमची साथ देण्याचे वचन मी मोडत आहे. कृपया माझ्या मृत्यूनतर दुःख व्यक्त करू नका”, असा मजकूर निक्कीने पत्राच्या सुरुवातीला लिहिला.
निक्कीने पुढे लिहिले, “नशीबानेच असे सासर आणि प्रेमळ लोक भेटतात. प्रत्येकाने माझी उत्तम काळजी घेतली. कृपया दुःखी होऊ नका. मी अगतिकतेतून हे पाऊल उचलत आहे.”
स्वतःच्या वस्तूंचे वाटपही ठरवले
मृत्यूपश्चात आपल्या सामानाचे काय करायचे? हेही निक्कीने पत्रात नमूद केले आहे. आपली स्कूटर छोट्या दिराच्या भावी पत्नीला द्यावी. तसेच माझे दागिने वडिलांनी केले होते, तेही सूनेला भेट द्यावेत. सासूचा मोबाइल जुना झाला आहे, त्यामुळे त्यांना माझा मोबाइल द्या, अशा सूचना निक्कीने दिल्या आहेत.
निक्कीच्या पश्चात पती आणि त्यांचा लहान मुलगा आहे.
निक्कीचा पती शिवम हा मध्य प्रदेशात रेल्वेत नोकरी करतो. दुर्धर आजार असूनही सासरच्या लोकांनी तिच्या उपचारात काहीही कमी पडू दिले नव्हते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, निक्कीने दिल्ली पोलीस भरतीची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि ती पुढच्या टप्प्याची तयारी करत होती. पण प्रकृती खूपच खालावत गेल्यामुळे तिला पुढचा टप्पा पार करता येणार नाही, याची जाणीव झाली होती.
निक्कीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर रवतपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सहायक पोलीस आयुक्त दिलीप सिंह यांनी माहिती देताना म्हटले की, दीर्घ आजारामुळे निक्की खूप नैराश्यात गेल्याचे नोटमधील मजकुरावरून समजत आहे.
सुसाइड नोटमधील मजकुरानुसार, दुर्धर आजारामुळे निक्की नाखुश असल्याचे दिसते. निक्कीचे आई-वडील किंवा सासरच्या मंडळींनी या घटनेनंतर एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केलेले नाहीत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे दिलीप सिंह यांनी सांगितले.
