माणूस आणि कुत्रा यांच्यातील भावनिक नात्याबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. अनेक घरांमध्ये कुत्र्याला घरातल्या सदस्यासारखी वागणूक मिळते. कानपूरमध्ये महिला डॉक्टरचं निधन झाल्यानंतर, तिच्या घरातील पाळीव कुत्र्यानेही बिल्डींगमधून उडी मारत आपला जीव दिला आहे. डॉ. अनिता राज सिंग असं या महिलेचं नाव असून १२ वर्षांपूर्वी अनिता यांनी कुत्र्याच्या पिल्लाला दत्तक घेतलं होतं. अनिता यांनी कुत्र्याचं नाव जया असं ठेवलं होतं.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी संध्याकाळी डॉ. अनिता यांचा मृतदेह त्यांच्या कानपूर येथील घरी आणण्यात आला. “आईला घरी आणल्यापासून जया जोरजोरात भुंकायला लागली. तिला काय होत होतं हे आम्हाला समजलं नाही. थोड्यावेळाने ती बिल्डींगच्या गच्चीत गेली आणि तिकडून तिने उडी मारली. या अपघातात जया जखमी झाली, आमच्या मित्र-परिवाराने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. उंचावरुन उडी मारल्यामुळे तिची हाडं तुटली होती.” डॉ. अनिता यांचा मुलगा तेजस याने माहिती दिली.

ज्या क्षणापासून डॉ. अनिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळपासून जया घरात उदास असायची. १२ वर्षांपूर्वी जयाला डॉ. अनिता यांनी दत्तक घेतलं तेव्हा तिची तब्येत खूप खराब होती. आईपासून दुरावल्यामुळे आम्ही तिला दत्तक घेण्याचं ठरवलं आणि नंतर ती आमच्याच परिवाराचा हिस्सा झाली होती. डॉ. अनिता यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर परिवाराने जयालाही अखेरचा निरोप दिला आहे.