उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका पेट्रोल पंपावर कार मालकाला चक्क ४५ लिटर क्षमता असलेल्या टाकीत ५२ लिटर पेट्रोल भरल्याचे बिल देण्यात आले. या फसवणुकीनंतर कार मालकाने थेट प्रशासनाकडे तक्रार केली असून, जिल्हा प्रशासनाने या पेट्रोल पंपावरील मशीनची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकी घटना काय?

कानपूर येथील चरण सिंग यांनी नुकतीच एक ब्रँड न्यू ‘फॉक्सवॅगन व्हर्टस’ कार खरेदी केली होती. कारचे पेट्रोल संपत आल्याने ते जवळच्याच एका पेट्रोल पंपावर टाकी फुल्ल करण्यासाठी गेले. त्यांनी कर्मचाऱ्यांना गाडीची टाकी पूर्ण भरण्यास सांगितले.

गाडीत पेट्रोल भरत असताना सुरुवातीला मशीन ४१ लिटरवर येऊन अचानक थांबले. चरण सिंग यांनी कर्मचाऱ्यांना विचारले असता, “जास्त प्रमाणात पेट्रोल भरायचे असल्यास दोन टप्प्यांत भरावे लागते,” असे अजब कारण कर्मचाऱ्यांनी दिले. यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा पेट्रोल भरण्यास सुरुवात केली.

बिल पाहून कार मालक थक्क

पेट्रोल भरून झाल्यावर जेव्हा चरण सिंग यांच्या हातात बिल आले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. बिलावर एकूण ५२ लिटर पेट्रोल भरल्याचे नमूद केले होते. ज्या कारच्या टाकीची कमाल क्षमताच अधिकृतपणे फक्त ४५ लिटर आहे, त्यात ५२ लिटर पेट्रोल कसे मावू शकते? असा सवाल करत सिंग यांनी पंप कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली साक्ष

पंप व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यानंतर, सिंग यांनी थेट फॉक्सवॅगन कार कंपनीच्या प्रतिनिधीला पेट्रोल पंपावर बोलावून घेतले. कंपनीच्या अधिकाऱ्याने घटनास्थळी येऊन कायदेशीररीत्या प्रमाणित केले की, या मॉडेलच्या टाकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत ४५ लिटरपेक्षा जास्त पेट्रोल बसूच शकत नाही. कंपनीच्या या तांत्रिक पुराव्यामुळे पेट्रोल पंप चालकांची बोलती बंद झाली. तरीही त्यांनी वेगवेगळ्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला.

प्रशासनाकडून चौकशी सुरू

या फसवणुकीनंतर चरण सिंग यांनी स्थानिक वजन आणि मापे विभागाचे अधिकारी आणि पेट्रोल पंप चालकांच्या संगनमताने हा मोठा घोटाळा सुरू असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने पेट्रोल पंपावरील इंधन वितरण यंत्रांची तपासणी करण्याचे आणि मशीनमध्ये काही फेरफार केला आहे का, याचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये पेट्रोल पंपांवरील पारदर्शकतेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.