उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये जवळपास सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या २५ वर्षीय अविवाहित महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी दोन पुरुषांना अटक केली आहे. यामध्ये एका सुरक्षा रक्षकाचा आणि एका कारखाना कामगाराचा समावेश आहे. दोघांवरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अरविंद उर्फ गोले पांडे (५६) आणि प्रांजुल पाल (२८) अशी आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृत महिलेचे या दोघांशी नियमित फोनवरून संपर्क होते. ती दोघांच्या संपर्कात असल्याचे तिच्या कॉल रेकॉर्डमधून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
पोलिसांना संशय आहे की, महिलेचे दोघांशी संबंध होते आणि दोघांपैकी कोण तिच्या गर्भातील बाळाचा पिता आहे, हे तपासण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही आरोपींचे डीएनए नमुने घेतले जाणार असून, महिलेच्या गर्भातील भ्रूणाचा नमुना जतन करून ठेवण्यात आलेला आहे.
गर्भवती झाल्यानंतर दोघांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला कानपूरमधील एका खासगी कंपनीत काम करत होती. प्राथमिक तपासात ती आरोपींच्या संपर्कात असल्याचे आढळले. गर्भवती झाल्यानंतर दोन्ही पुरुषांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिला आवश्यक मदत किंवा आधार दिला नाही, असा पोलिसांचा संशय आहे. महिलेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीतही या दोघांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
सहाय्यक पोलीस आयुक्त कृष्णकांत यादव यांनी सांगितले की, भ्रूणाचा नमुना जतन करण्यात आला असून पितृत्व निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे.
रुग्णालयातून मृतदेह शेतात नेल्याचा आरोप
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर तिने अरविंदला फोन केला होता. त्यानंतर अरविंद तिला रुग्णालयात घेऊन गेला. उपचारादरम्यान १२ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला.
पोलिसांचा आरोप केला आहे की, अरविंदने रुग्णालयात स्वतःची ओळख महिलेच्या वडिलांप्रमाणे करून दिली. तिच्या मृत्यूनंतर त्याने रुग्णवाहिकेतून मृतदेह नेला. मात्र, घरापर्यंत मृतदेह नेण्यास चालकाने नकार दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यानंतर तो घरापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर उतरला आणि महिलेचा मृतदेह एका शेतात सोडून घरी परतल्याचा आरोप आहे.
१३ ऑगस्टला सापडला मृतदेह
१३ ऑगस्ट रोजी पोलिसांना एका शेतात महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी तिची ओळख पटवली.
शवविच्छेदनातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसल्याने तिच्या शरीरातील भ्रूणाचे नमुने जतन करण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
