Kanpur Trader Thai Woman Marriage Fraud : उत्तर प्रदेशातील एका चामड्याच्या व्यापाऱ्याने थायलंडमधील एका महिलेची सुमारे ६० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कानपूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या आरोपानुसार, लग्नादरम्यान त्या व्यापाऱ्याने आपण अविवाहित असल्याची खोटी माहिती दिली होती. मात्र, कानपूरमध्ये आल्यानंतर तो आधीपासूनच विवाहित असून, त्याला तीन मुले असल्याचे वास्तव समोर आले. याबद्दल सिस्टर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
सोशल मीडियावरून झाली ओळख
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुमारे चार वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची मोहम्मद इरफान याच्याशी ओळख झाली होती. इरफान व्यवसायानिमित्त वारंवार थायलंडला जात असल्याने दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर दोघांनी थायलंडमध्ये स्थानिक पद्धतीनुसार लग्न केल्याचा दावा महिलेने केला आहे.
व्यवसायासाठी घेतले ६० लाख
लग्नानंतरही इरफानचे थायलंडमध्ये येणे-जाणे सुरूच होते. या कालावधीत व्यावसायिक गरजा आणि अडचणींचे कारण सांगून, त्याने तिच्याकडून अनेक वेळा पैसे घेतले. ही रक्कम हळूहळू वाढून तब्बल ६० लाख रुपयांवर पोहोचली. महिलेने जेव्हा तिचे पैसे परत मागण्यास सुरुवात केली, तेव्हापासून इरफानच्या वागण्यात बदल झाला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
‘पैसे हवे असतील तर भारतात ये, धर्मांतर कर’
महिलेच्या आरोपानुसार, पैसे परत मागण्यास सुरुवात केल्यावर, “पैसे हवे असतील तर भारतात येऊन माझ्यासोबत राहावे लागेल आणि इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल,” अशी अट इरफानने तिच्यासमोर ठेवली. इतकेच नव्हे, तर तिला बुरखा घालण्याची सक्तीही करण्यात आली. महिलेने या सर्व अटी नाकारल्यावर इरफान फेब्रुवारी २०२६ मध्ये भारतात परतला आणि त्याने तिचे फोन घेणेही पूर्णपणे बंद केले.
कानपूरला पोहोचल्यावर फुटले बिंग
वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्रस्त झालेली ती महिला स्वतः थायलंडमधून कानपूरला पोहोचली. ६ ऑक्टोबर रोजी ती एका परिचितासोबत लाटूश रोडवरील इरफानच्या घरी गेली. तिथे गेल्यानंतर इरफान आधीच विवाहित असून, त्याला तीन मुले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिलेने पोलिसांकडे लग्नाशी संबंधित कागदपत्रे, दोघांचे फोटो आणि आर्थिक व्यवहाराचे पुरावे सादर केले आहेत.
महिलेकडून मारहाणीचा आरोप
इरफानच्या घरी गेल्यानंतर आपल्याला मारहाण करण्यात आली आणि धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला, असा आरोपही पीडितेने केला आहे. ती थायलंडमध्ये स्वतः कॅन्टीन आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय चालवते. इरफानला दिलेले पैसे तिने स्वतःच्या कमाईतून आणि काही नातेवाईकांकडून कर्ज काढून गोळा केले होते, असे तिने पोलिसांना सांगितले.
पोलिसांकडून कायदेशीर कारवाई
या प्रकरणी कानपूरच्या अनवरगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी इरफानला अटक केली आहे. पोलीस उपआयुक्त (मध्य विभाग) अतुल श्रीवास्तव यांनी आरोपीला अटक केल्याची पुष्टी दिली असून, महिलेने दिलेली कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि इतर आरोपांची पडताळणी सुरू असल्याची माहिती दिली आहे.
