कानपूरमध्ये एका ६३ वर्षीय औषध व्यवसायिकाची घरातच निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. विनीत विनोचा असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या शरीरावर चाकूचे २६ हून अधिक वार करण्यात आले होते. ५ सप्टेंबर रोजी राहत्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी त्यांची ३० वर्षीय सून शालू विनोचा हिला ताब्यात घेतले. सासऱ्याच्या हत्येसाठी तिने काही जणांना सुपारी दिली होती, असा पोलिसांचा संशय आहे. मात्र, हत्येतील तिची नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
घरातील नोकराने दिली धक्कादायक माहिती
पश्चिम विभागाचे पोलिस उपायुक्त एस.एम. कासिम आबिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील मदतनीस विशाल गौतम आणि त्याचा कथित साथीदार राजकिशोर यांनी विनीत यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. ही हत्या शालूच्या सांगण्यावरून केल्याचे त्यांनी पोलिसांकडे मान्य केल्याचे सांगण्यात आले. दोघांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्यांच्या पायाला गोळी लागल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
‘पैशांवर आमचे नियंत्रण नव्हते’
पोलिसांच्या माहितीनुसार, शालूने चौकशीदरम्यान घरातील आर्थिक व्यवहारांवरून सासऱ्यांबरोबर मतभेद असल्याचे सांगितले. तिच्या दाव्यानुसार, पती-पत्नीला घरातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच दर महिन्याला ठराविक रक्कम दिली जात होती. जास्त पैशांची गरज भासल्यास विनीत यांच्याकडे मागणी करावी लागत होती. याच आर्थिक नियंत्रणाला कंटाळून सासऱ्यांना संपवण्याचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र शालूच्या जबाब तपासण्यासाठी तिचे कॉल डिटेल रेकॉर्ड आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.
पार्टीला गेले होते कुटुंबीय
पोलिसांच्या तपासानुसार, ५ आणि ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री ही हत्या झाली. रात्री साडेदहा ते पहाटे तीनच्या दरम्यान विनीत यांच्यावर हल्ला झाल्याचा अंदाज आहे. त्यांचा मुलगा सुब्रत, सून आणि नातू पार्टीसाठी बाहेर गेले होते. ते घरी परतले असता फ्लॅटचा मुख्य दरवाजा उघडा होता. घरातील एका खोलीत विनीत यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला आढळला.
तीन पिढ्यांपासून औषध व्यवसाय
विनीत विनोचा हे शहरातील प्रसिद्ध औषध व्यापारी होते. त्यांचा मुलगा सुब्रत यांच्याबरोबर ते बिरहाना रोडवरील फार्मा ट्रेडर्स हा औषध व्यवसाय चालवत होते. या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ४० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उत्तर प्रदेश रिटेल केमिस्ट्स अँड डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे सचिव राजेंद्र सैनी यांनी सांगितले की, विनोचा कुटुंबाचा औषध व्यवसाय तीन पिढ्यांपासून सुरू आहे. विनीत यांच्या वडिलांनी १९६८ मध्ये हा व्यवसाय सुरू केला होता. पुढे विनीत यांनी व्यवसाय सांभाळला आणि त्यांचा मुलगा सुब्रतही व्यवसायात सहभागी झाला.
पत्नी गाझियाबादला, मुलगी गुरुग्राममध्ये
घटनेच्या वेळी विनीत घरी एकटे होते. त्यांची पत्नी पुनिता या विवाह कौन्सलर असून त्या गाझियाबादला गेल्या होत्या. त्यांची मुलगी सुभानी आणि जावई दोघेही अभियंते असून गुरुग्राममध्ये राहतात.
दरम्यान, शालूची या हत्येतील भूमिका नेमकी काय होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कॉल रेकॉर्ड, आरोपींचे जबाब आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे हत्येचा संपूर्ण कट उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
