केरळमधील प्रमुख इस्लामिक विद्वानांच्या एका गटाने धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजकांना केलेल्या एका आवाहनावरून वाद निर्माण झाला होता. ‘समस्त केरळ जमिय्यतुल उलामा’च्या कांथापुरम गटाने काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त परिपत्रक जारी करत महिलांनी पुरुषांसोबत सार्वजनिक व्यासपीठांवर उपस्थित राहू नये, असं आवाहन केलं होतं. यावरून वाद निर्माण झाला होता. या वादानंतरही आता केरळमधील इस्लामिक अभ्यासक कांथापुरम ए.पी.अबूबकर मुसलियार यांनी या आवाहनाचं समर्थन केलं आहे.

इस्लामिक अभ्यासक कांथापुरम ए.पी.अबूबकर मुसलियारल यांनी म्हटलं की, महिलांनी घरापुरतंच मर्यादित राहिलं पाहिजे. त्यांना सार्वजनिक व्यासपीठांवर आणल्याने अनर्थ ओढावतो. त्यामुळे इस्लाममध्ये स्त्रियांसाठी ‘हिजाब’ पद्धत असल्याचं त्यांनी नमूद केलं. सुन्नी इस्लामिक विद्वान कांथापुरम ए.पी.अबूबकर मुसलियार यांनी रविवारी कोचीमधील एका कार्यक्रमात हे भाष्य करत ‘समस्त केरळ जमिय्यतुल उलामा’च्या कांथापुरम गटाच्या आवाहनाचं समर्थन केलं. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

दरम्यान, कांथापुरम ए.पी.अबूबकर मुसलियार हे भारतातील एक प्रभावशाली इस्लामिक विद्वान, सुफी विचारवंत आणि भारताचे वर्तमान ग्रँड मुफ्ती आहेत. त्यांना प्रामुख्याने केरळमधील सुन्नी मुस्लिम समुदायाचे प्रमुख नेते म्हणून ओळखलं जातं. तसेच ते ‘समस्त केरळ जमिय्यतुल उलामा’च्या कांथापुरम गटाचं नेतृत्व करतात.

कांथापुरम ए.पी.अबूबकर मुसलियार यांनी काय म्हटलं?

“महिलांना सार्वजनिक व्यासपीठांवर आणल्याने मोठा विनाश ओढवतो, हे ओळखूनच इस्लामने महिलांसाठी ‘हिजाब’पद्धत अनिवार्य केली. तसेच पवित्र कुराणही हेच सांगतं की, महिलांनी घरातच राहावं आणि सार्वजनिक ठिकाणी येऊ नये”, असं कांथापुरम ए.पी.अबूबकर मुसलियार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुन्नी-शाफी इस्लामिक अभ्यासकांची राज्यातील प्रमुख संस्था असलेल्या ‘समस्त केरळ जमिय्यतुल उलामा’चे अध्यक्ष ई.सुलेमान मुसलियार आणि सरचिटणीस कांथापुरम यांनी निर्देश दिले होते की, महिलांनी पुरुषांसोबत एकाच व्यासपीठावर येऊ नये किंवा सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहू नये. या परिपत्रकावर विविध स्तरांतून टीका झाली होती. अनेक महिला नेत्यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

आता आपल्या भूमिकेचं समर्थन करताना कांथापुरम यांनी म्हटलं की, धार्मिक विद्वानांनी विशेषतः ‘समस्त’च्या नेत्यांनी गेल्या १०० वर्षांपासून अशी मते मांडली आहेत आणि शिकवली आहेत. त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे की सर्व जाणकार व्यक्तींनी आणि विशेषतः ‘समस्त’च्या नेत्यांनी गेल्या १०० वर्षांपासून ही शिकवण दिल्यामुळेच या देशातील महिलांनी आपला सन्मान आणि प्रतिष्ठा जपली आहे. इस्लामचा अभ्यास केलेल्या धार्मिक विद्वानांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी टीकेची पर्वा न करता या विषयावर आपलं मत मांडत राहावं. जेव्हा अशी भूमिका मांडली जाते आणि त्यावर इतर संघटनेचे नेते आक्षेप घेतात, तेव्हा धर्माचा अभ्यास केलेले लोक म्हणून सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही ते सांगत राहू. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही”, असं कांथापुरम यांनी स्पष्ट केलं आहे.