येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपणच जिंकणार असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत असले तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसेल असे मानले जात आहे. आता या लढतीत अमेरिकेचा प्रसिद्ध गायक, रॅपर कान्ये वेस्ट याने उडी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

कान्ये वेस्ट हा, अमेरिकेत प्रचंड प्रसिध्द आहे. त्याचे रॅप साँग अमेरिकन लोकांना प्रचंड भावतात. या लोकप्रियतेच्या बळावर आता तो राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार आहे. कान्ये वेस्टने नुकतेच याबद्दल टि्वट केले आहे. त्यात त्यानं म्हटलंय की, मी आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहे.

त्याच्या या निर्णयाला टेस्ला या बढ्या कंपनीचे धनाढ्य मालक एलॉन मस्क यांनीही पाठिंबा दिला आहे. कान्येच्या टि्वटला उत्तर देत मस्क यांनी म्हटलं की, “तुला माझा पूर्ण पाठिंबा आहे.”

कान्ये वेस्टच्या या टि्वटला रिप्लाय करत त्याची पत्नी आणि अभिनेत्री किम कार्दशियन हिनेही अमेरिकेचा झेंडा दाखवत समर्थन केलं आहे. या टि्वटनंतर किम कार्दशियन चर्चेत आली आहे. आता ही अभिनेत्री अमेरिकेची फर्स्ट लेडी होणार का? असा उपरोधिक सवाल काहींनी टि्वटरवर केला आहे.