Ashok Mittal Quits AAP latest news: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील दहापैकी ७ खासदारांचा गट शुक्रवारी भाजपमध्ये विलीन झाला. त्यामध्ये कधी काळी केजरीवाल यांच्या अत्यंत नजीकचे मानले गेलेले राघव चड्ढा, स्वाती मालिवाल, अशोक मित्तल यांचा समावेश आहे. महत्त्वाच्या नेत्यांनीच आपला रामराम ठोकल्याने आपवर मोठं संकट कोसळलं आहे. दरम्यान, यावरून दिल्लीचे कामगार आणि रोजगार मंत्री कपिल मिश्रा यांनी शुक्रवारी आम आदमी पार्टीचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अरविंद केजरीवाल कालपर्यंत अशोक मित्तल यांच्याच घरात राहत होते, असं कपिल मिश्रा म्हणाले आहेत.
मजेशीर गोष्ट म्हणजे…
कपिल मिश्रा यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये लिहिले की, “सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे केजरीवाल आज सकाळपर्यंत अशोक मित्तलजींच्या घरी तळ ठोकून होते. आज अशोक मित्तलजींनी आप (AAP) सोडली, त्यामुळे केजरीवालांना त्यांचे बस्तान हलवावे लागले.”
दरम्यान, शुक्रवारीच अरविंद केजरीवाल यांनी एक ट्वीट केलं होतं. ते म्हणाले होते, “अलीकडेच केंद्र सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार, आम आदमी पक्षाचा राष्ट्रीय संयोजक म्हणून मला एक घर दिले आहे. मी आता माझ्या कुटुंबासह त्या घरात राहायला गेलो आहे.” त्यांच्या या ट्वीटलाच रिशेअर करून कपिल मिश्रा यांनी टीका केली होती.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये कपिल मिश्रा म्हणाले की, “केजरीवालांच्या टोळीत आता फक्त चोर आणि भ्रष्ट लोकच उरले आहेत. ज्याचा आत्मा अजून जिवंत आहे, तो तिथे जास्त काळ राहू शकत नाही. राघव भाई, संदीप पाठक, अशोक मित्तल आणि इतर सहकाऱ्यांचा निर्णय धाडसी आणि कौतुकास्पद आहे. पंजाबच्या जनतेला केजरीवालांच्या लुटीपासून वाचवण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरेल.”
