Kapil Sibal ashamed to live in India remark : तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यांच्या घटनांनंतर राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी “अशा देशात राहण्याची लाज वाटते” असं वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोनारपूर येथे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर काही लोकांनी दगड आणि अंडी फेकली, तसेच त्यांना शिवीगाळही केली होती. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी हुगळी जिल्ह्यात पक्षाचे दुसरे खासदार कल्याण बॅनर्जी यांना एका पोलिस ठाण्यासमोर धक्काबुक्की करण्यात आली होती. यावरून कपिल सिब्बल यांनी संताप व्यक्त केला.

कपिल सिब्बल नेमकं काय म्हणाले?

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरील या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देताना सिब्बल म्हणाले, “हे अत्यंत लाजीरवाणं आहे. मला अशा देशात राहण्याची लाज वाटते जिथे अशा घटना घडतात. सत्तेत असलेला राजकीय पक्ष आपल्या महान नेत्यांनी प्रजासत्ताक स्थापनेच्या वेळी रचलेला लोकशाहीचा पाया नष्ट करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशा देशात राहण्याची मला लाज वाटते.”

भाजपाचा सिब्बल यांच्यावर पलटवार

सत्ताधारी पक्षावर टीका केल्याबद्दल भाजपाने सोमवारी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाजपाने त्यांच्यावर भारतद्वेषी असल्याचा आरोप केला आणि २०२१ मधील पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसेवर ते गप्प का राहिले, असा सवाल केला. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटलं की, “देशाच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करून सिब्बल यांनी कोट्यवधी रुपये कमावले आणि तरीही त्यांना भारतात राहण्याची लाज वाटते.”

“कपिल सिब्बल म्हणतात की त्यांना भारतात राहण्याची लाज वाटते. प्रश्न असा आहे की, जेव्हा २०२१ मध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार झाला आणि त्यात भाजपा आणि काँग्रेसच्या ३०० हून अधिक कार्यकर्त्यांची हत्या झाली, तेव्हा कपिल सिब्बल यांनी कधीही तोंड उघडले नाही. आर. जी. कर आणि संदेशखालीसारख्या प्रकरणांमध्येही कपिल सिब्बल गप्प राहिले”, असं पूनावाला म्हणाले. सरकारसोबत राजकीय मतभेद असणं स्वीकारार्ह आहे, परंतु भाजपाला विरोध करण्याच्या नादात काही विरोधी नेत्यांमध्ये देशावरच हल्ला करण्याची प्रवृत्ती का दिसून येते, असा सवाल पूनावाला यांनी केला. “भाजपाला विरोध करणे वेगळे आहे, पण भारताला विरोध का? तुमचे राजकीय मतभेद असू शकतात, पण भारताचा द्वेष का?” असा प्रश्न पूनावाला यांनी विचारला. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जुन्या विधानांचाही उल्लेख केला आणि आरोप केला की काही विरोधी नेते नेहमीच भारताच्या लोकशाही संस्था, न्यायव्यवस्था आणि सुरक्षा दलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सोनारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याशी संबंधित घटनेप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.”