Kapil Sibal on Mohan Bhagwat Speech: ज्येष्ठ वकील आणि राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्क येथे केलेल्या भाषणावर टीका केली आहे. न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे ‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ (AHEAD) द्वारे आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, ‘विविधतेत एकता’ हा भारताचा डीएनए आहे. त्यांच्या या टिप्पणीवर आता कपिल सिब्बल यांनी टीका केली आहे.

कपिल सिब्बल यांनी एक्सवर यासंबंधी पोस्ट लिहिली आहे. “केवळ शब्दांनी काही होत नाही. कृतीतही हे दिसायला हवे”, असे कपिल सिब्बल म्हणाले आहेत. मोहन भागवत म्हणाले होते, “भारताचे ध्येय जगाला ‘विविधतेतील एकता’ दाखवून देणे हेच आहे. आपण सर्व एक आहोत आणि आपल्यातील ही विविधता आपल्या एकतेला अधिक सुंदर बनवते.”

‘विदेशात चांगले बोलतात, देशात मौन’

कपिल सिब्बल यांनी मोहन भागवत यांच्या एका विधानाचा उल्लेख आपल्या पोस्टमध्ये केला आहे. “विविधता हे आपल्या अंगभूत एकतेचे भूषण आहे. तिचे रक्षण केलेच पाहिजे”, असे भागवत म्हणाले होते. यावर टीका करताना कपिल सिब्बल म्हणाले, “विदेशात चांगले बोलतात, मात्र देशात मौन बाळगतात. शब्दांनी काही होत नाही, कृतीतून हे दाखवून दिले पाहिजे.”

न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत काय म्हणाले?

आपल्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “राष्ट्र ही केवळ भौगोलिक रचना नसते. या विश्वाच्या निर्मितीत प्रत्येक राष्ट्राला एक विशिष्ट कर्तव्य पार पाडायचे असते. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक देशाचे एक ध्येय असते. भारताचे ध्येय जगाला ‘विविधतेतील एकता’ दाखवून देणे हेच आहे. आपण सर्व एक आहोत आणि आपल्यातील ही विविधता आपल्या एकतेला अधिक सुंदर बनवते.”

ते पुढे म्हणाले, “आपल्यातील विविधतेचा स्वीकार आणि आदर झालाच पाहिजे, तिचा उत्सव साजरा केला पाहिजे. परंतु हे करत असताना आपल्या मनातील एकात्मतेची भावना कधीही कमी होता कामा नये. भाषा आणि धर्म वेगवेगळे असल्याने आपण वेगळे आहोत असे वाटू शकते. भौतिकदृष्ट्या ते खरे असले, तरी आत्मिक पातळीवर आपण सर्व एक आहोत.”