काँग्रेस पक्षांतर्गत मुद्द्यांवर पक्ष श्रेष्ठींना अडचणीचे प्रश्न विचारणाऱ्या जी-२३ नेत्यांच्या गटातील एक कपिल सिब्बल यांनी अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव व इतर सपा नेतेही हजर होते. त्यांना समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना कपिल सिब्बल यांनी “मोदी सरकार विरोधात आघाडी करण्याची आमची इच्छा आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरताना कपिल सिब्बल यांच्यासोबत सपाचे प्रमुख अखिलेश यादव देखील होते. यावेळी सिब्बल यांनी सांगितलं की त्यांनी १६ मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.

“मोदी सरकार विरोधात आघाडी तयार करू इच्छितो”

कपिल सिब्बल म्हणाले, “मला वाटतं जेव्हा एका अपक्ष उमेदवाराचा आवाज येईल तेव्हा लोकांना हा उमेदवार कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही असं वाटले. आम्ही विरोधी पक्षात राहून मोदी सरकारला विरोध करता यावा यासाठी आघाडी तयार करू इच्छितो. २०२४ मध्ये असं वातावरण बनावं की मोदी सरकारच्या सर्व चुका लोकांपर्यंत पोहचतील. मी यासाठी प्रयत्न करेल. मी १६ मे रोजीच काँग्रेस पक्ष सोडला. मला उत्तर प्रदेशमधील सर्वांचा पाठिंबा आहे.”

“राज्यसभेसाठी आणखी दोन नावांचीही लवकरच घोषणा”

कपिल सिब्बल यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले, “समाजवादी पक्षाकडून ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आला आहे. ते सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जातील. राज्यसभेसाठी आणखी दोन नावांचीही लवकरच घोषणा होईल.”

यावेळी उत्तर प्रदेशमधून ११ राज्यसभा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी आमदारांच्या संख्याबळाचा विचार करता सपाला ३ जागा मिळणार आहेत.

दरम्यान, मागील काही काळापासून काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या पूर्णवेळ अध्यक्षाच्या नियुक्तीची आग्रही मागणी केली होती. तसेच पक्षांतर्गत बदलांची मागणी करत वेगळी भूमिका घेतली होती. या नेत्यांना माध्यमांमध्ये जी-२३ असंही नाव देण्यात आलं.

हेही वाचा : “हा विरोधाभास आहे, जे यांना खास वाटायचे, ते सोडून गेले आणि…” कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वाला सुनावलं!

यात माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. मात्र, आता कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षातील बदलांचा आग्रह सोडत वेगळा मार्ग चोखाळला आहे. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यांनी समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sibal first reaction after resignation from congress pbs
First published on: 25-05-2022 at 15:01 IST