नवी दिल्ली : काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी गांधी कुटुंबाव्यतिरिक्त अन्य व्यक्तीच्या नियुक्तीची उघडपणे मागणी करणारे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे बुधवारी जाहीर केले. त्यांनी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर उत्तर प्रदेशातून अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला.  समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर, सिबल यांनी ‘‘मी काँग्रेसमधून बाहेर पडलो असून १६ मे रोजी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे’’, अशी माहिती लखनऊ येथे पत्रकारांना दिली.

 उदयपूरमध्ये १३ ते १५ मे या तीन दिवसांमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी आमंत्रण देऊनही सिबल उपस्थित राहिले नाहीत. चिंतन शिबिर संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सिबल यांनी राजीनामा दिला. सिबल यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसने संयत प्रतिक्रिया दिली. ‘‘काँग्रेस पक्ष मोठा असून देशाच्या राजकारणात पक्षाचे स्थान व्यापक आहे. काँग्रेसमध्ये अनेक येतात आणि जातात. पक्ष सोडून जाणाऱ्यांना दोष देण्याची गरज नाही. काँग्रेस पक्ष स्वत:च्या ताकदीवर पुन्हा मजबूत होईल. पक्ष संघटनेची फेररचना केली जात असून त्यामध्ये प्रत्येकाला जबाबदारी दिली जाईल’’, असे मत काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केले.

  काँग्रेस अंतर्गत बंडखोर गटातील (जी २३) सदस्यांमध्ये कपिल सिबल यांनी पक्षनेतृत्वाविरोधात सर्वात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी प्रामुख्याने राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे आणि सातत्याने टीका केली होती. सिबल यांनी प्रसारमाध्यमांमध्ये काँग्रेसविरोधात न बोलता पक्षाच्या व्यासपीठावर मतभेद व्यक्त करावेत, असे सोनिया गांधी यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार बजावले होत़े मात्र, सिबल यांनी पक्षनेतृत्वावरील टीका कायम ठेवली होती. ‘जी-२३’ गटातील गुलाम नबी आझाद तसेच, अन्य बंडखोर नेत्यांना चिंतन शिबिरातील विविध समित्यांमध्ये सामावून घेतले गेले होत़े  मात्र, सिबल यांना स्थान देण्यात आले नाही. सिबल यांची राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत ४ जुलैला संपणार असली तरी, त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता नव्हती. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे २ आमदार असल्याने राज्यसभेवर काँग्रेसचा एकही खासदार निवडून येऊ शकत नाही.

राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशतील ११ जागा ४ जुलै रोजी रिक्त होत असून त्यात, ५ भाजप, ४ सप, २ बसप, १ काँग्रेसचा समावेश आहे. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. ‘सप’कडे १११ आमदार असल्याने कपिल सिबल यांना राज्सभेवर पाठवता येऊ शकते. जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले ‘सप’चे खासदार आझम खान यांनी सिबल आणि अखिलेश यांच्यामध्ये मध्यस्थी केल्याचे सांगितले जाते. कपिल सिबल हे आझम खान यांच्यासाठी विविध खटल्यांमध्ये त्यांचे वकील म्हणून न्यायालयांत युक्तिवाद करतात. 

भाजपविरोधात एकजुटीवर भर’

‘‘माझे ३०-३१ वर्षे काँग्रेसशी नाते होत़े  राजीव गांधी असताना मी काँग्रेसमध्ये आलो. मला काँग्रेस सोडताना अत्यंत दु:ख वाटत असले तरी, काही निर्णय घ्यावे लागतात. काँग्रेसशी माझे वैचारिक मतभेद नाहीत, विचारांच्या दृष्टीने मी काँग्रेसबरोबरच आहे. पक्षामध्ये पक्षशिस्त पाळावी लागते पण, स्वत:चे मत मांडण्याचीही मुभा असली पाहिजे’’, असे मत सिबल यांनी व्यक्त केले. ‘‘काँग्रेसमध्ये नसलो तरी, भाजपविरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करत राहू. सहा वर्षे मी राज्यसभेत मोदी सरकारच्या विरोधात बोलत होतो, आता पुढील सहा वर्षेदेखील मी हेच काम करेन’’, असेही सिबल म्हणाले.

पाच महिन्यांत पाच नेत्यांचा राजीनामा गेल्या पाच महिन्यांमध्ये पाच काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला आहे. कपिल सिबल यांच्याप्रमाणे काँग्रेस नेतृत्वावर नाराज होऊन पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांमध्ये हार्दिक पटेल, सुनील जाखड, अश्वनी कुमार, आरपीएन सिंह यांचा समावेश आहे. जाखड, अश्वनी कुमार व आरपीएन या तीनही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, हार्दिक पटेलही भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते.