काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी यांनी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपाकडून टीका केली जात असतानाचा विरोधकांमध्ये देखील अंतर्गत आरोप-प्रत्यारोप केले जाऊ लागले आहेत. या भेटीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी “भारतात आता युपीए अस्तित्वात नाही”, असं विधान केल्यानंतर त्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र आक्षेप घेण्यात येत आहे.

ममता बॅनर्जी यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांच्या सूरात सूर मिसळला. यानंतर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात येत असून पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.

“काँग्रेसशिवाय यूपीए म्हणजे आत्म्याशिवाय शरीर अशी अवस्था होईल. आता विरोधकांनी एकजूट दाखवण्याची वेळ आहे”, असं कपिल सिब्बल आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

सिब्बल यांच्याआधी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी देखील काँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी उभी करण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांचा निषेध केला. “भारतीय राजकारणाचं वास्तव सगळ्यांना माहिती आहे. कुणाला जर असं वाटत असेल की काँग्रेसशिवाय कुणी भाजपाला पराभूत करू शकेल, तर ते फक्त एक स्वप्न असेल”, असं वेणुगोपाल म्हणाले होते.

“२०२४च्या निवडणुकांमध्ये…”, ममता बॅनर्जींसोबत चर्चेनंतर शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका!

“यूपीए कुठं आहे?”

पत्रकारांनी यूपीएचं नेतृत्व शरद पवार करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर ममता बॅनर्जींनी यूपीए कुठं आहे? असा सवाल केला. यानंतर शरद पवार यांनी तात्काळ यावर बोलत विरोधीपक्षांमध्ये नेतृत्वावरून मतभेद नसल्याचं म्हटलं. तसेच आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याविषयी चर्चा केल्याचं सांगितलं.