Sanjay Kapoor Property Dispute Supreme Court: दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या ३०,००० कोटी रुपये मालमत्तेचा वाद सध्या न्यायालयात सुरु आहे. संजय कपूर यांच्या आई राणी कपूर आणि त्यांची तिसरी पत्नी प्रिया कपूर यांच्यात आर. के. फॅमिली ट्रस्टवरून हा वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी याप्रकरणी ट्रस्टच्या कारभारात हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी नवीन याचिका ऐकण्यास सहमती दर्शवली. “अत्यंत गुंतागुंतीचे हे कौटुंबिक प्रकरण महाभारतालाही फिके पाडेल”, असे मत यावेळी न्यायालयाने या वादावर नोंदवले.
हस्तक्षेप याचिका ऐकण्यास सहमती
न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला यांनी ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरुन सुरु असलेल्या वादाची तुलना महाभारताशी केली. कपूर कुटुंबाचा सुरु असलेला संघर्ष महाभारताच्या तुलनेत लहान वाटेल अशी टिप्पणी परडीवाला यांनी केली. याचवेळी त्यांनी राणी कपूर यांची हस्तक्षेप याचिका ऐकण्यास सहमती दर्शवली. “आम्ही याची चौकशी करू,” असे न्यायाधीश म्हणाले. “सर्वोच्च न्यायालयाच्या ७ मे च्या आदेशाला बगल देण्याचे प्रयत्न केले जात आहेत”, असा युक्तिवाद राणी कपूर यांच्या वकिलांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली होती.
राणी कपूर यांचा युक्तिवाद काय?
“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुसऱ्या दिवशी (८ मे) संबंधित मालमत्तेचा मोठा भाग असलेल्या रघुवंशी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड (RIPL) कडून १८ मे रोजी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यासाठी नोटीस बजावली होती. या बैठकीच्या कार्यसूचीमध्ये दोन नवीन स्वतंत्र संचालकांची नियुक्ती आणि अधिकृत बँक स्वाक्षरीकर्त्यांमध्ये फेरबदलांचा समावेश आहे, हे मध्यस्थीद्वारे मतभेद सोडवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रयत्नांच्या मूळ हेतूच्या विरोधात आहे”, असा युक्तिवाद राणी कपूर यांच्या वकिलांनी न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचाही समावेश असलेल्या खंडपीठासमोर केला.
आरआयपीएलची गुंतागुंत
आरआयपीएलच्या वकिलांनी याबाबत स्पष्टीकरण देताना बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी असलेल्या आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच तसे करण्यात आल्याचे सांगितले. पण, राणी कपूर यांनी हा प्रयत्न म्हणजे कंपनीच्या गुंतवणुकीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न असल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. यासाठी रघुवंशी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक खात्यासाठी स्वतंत्र संचालकांची नियुक्ती आणि अधिकृत बँक स्वाक्षरीकर्त्यांमध्ये फेरबदलांचा समावेश करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
राणी कपूर यांची मागणी
राणी कपूर यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने २७ एप्रिल रोजी प्रिया कपूर यांच्याकडून उत्तर मागितले होते. ऑक्टोबर २०१७ मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे आरके फॅमिली ट्रस्ट तिच्या नावावर स्थापन करण्यात आली आणि कौटुंबिक मालमत्ता त्याच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. ‘सोना ग्रुप ऑफ कंपनीज’सह विविध व्यवसायांचे प्रमोटर असलेले तिचे मयत पती सुरिंदर कपूर यांच्या संपूर्ण मालमत्तेची ती एकमेव वारसदार होती, परंतु ही मालमत्ता फॅमिली ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यांनी न्यायालयाला तो ट्रस्ट रद्दबातल घोषित करण्याची विनंती केली आहे.
