इराणचे सर्वाेच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानातही उमटले. कराचीमधील अमेरिकेच्या वाणिज्य कचेरीच्या प्रवेशद्वारावर निदर्शकांनी धडक देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना रोखताना पोलिसांशी झालेल्या चकमकीत १० जणांचा मृत्यू झाला.
इराणवरील सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये खोमेनी यांच्या मृत्यूची खात्री झाल्यानंतर काही निदर्शक वाणिज्य कचेरीकडे जाण्याऱ्या रस्त्यावर जमत होते. त्यानंतर अचानक जमावाने पोलिसांवर हल्ला सुरू केला. परिस्थिती अटाेक्यात आणण्यासाठी लाठीमार सुरू केला. अश्रुधुराचे गोळे तसेच रबरच्या गोळ्यांचा वापर केला. मोठ्या संख्येने जमाव जमला होता. त्यांनी कचेरीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र पोलिसांनी थेट गोळीबार केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी झाले आहेत.
सिंधचे गृहमंत्री जियाउल हसन लंगर यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून या घटनेचा तातडीने अहवाल मागितला आहे.
या घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. यावेळी निदर्शक हिंसक झाले त्यांनी सुरक्षा व्यवस्थेला आव्हान दिल्याने पोलिसांना तशी कारवाई करावी लागली असे मंत्री लंगर यांनी सांगितले.
