Karachi Rains Death Toll News: मध्यपूर्वेतील युद्धामुळे अगोदरच इंधन आणि गॅस टंचाईचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आता अवकाळी पावसाने झोडपले आहे. कराचीमध्ये चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे १६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. जोरदार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासह अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
१६ नागरिकांचा मृत्यू
समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, पावसामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांची ओळख पटवण्यासाठी त्यांना सरकारी रुग्णालय आणि जिना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. पाकिस्तानची सर्वात सामाजिक कल्याण संस्था, ‘द एधी फाउंडेशन’च्या बचाव पथकाने बचावकार्यात भाग घेतला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, त्यांना शवागारात नेण्यात आले आहे. ओळख पटल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील, अशी माहिती फाउंडेशन’च्या वतीने रॉयटर्सला देण्यात आली आहे.
घरात शिरले पाणी
मुसळधार अवकाळी पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून, दुकान आणि घरात देखील पाणी घुसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, स्वयंसेवी संस्था आणि आपत्कालिन पथकाच्या जवांनी मदत व बचावकार्य सुरु करत अनेक मदतीचा हात दिला.
पावसासह वादळी वाऱ्याचा फटका
पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. प्रचंड वेगाच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांचे छत उडून जाणे, झाडे उन्मळून पडणे यासारख्या घटना घडल्या. वीजेच्या खांबांना देखील याचा फटका बसला व अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याचे वृत्त आहे. मुसळधार पावसामुळे कराचीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बचाव पथकांकडून बचावकार्य सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
