karenna-1मुस्लिम तरूणांशी लग्न करून दुसऱ्या धर्मात गेलेल्या महिलांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी सुरू करण्यात अभियानासाठी बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरच्या छायाचित्राचा वापर करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) ‘दुर्गा वाहिनी’ या महिला आघाडीने हे अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून हिंदू संघटनांनी ‘लव्ह जिहाद’ या संकल्पनेला पुन्हा एकदा विरोध करण्यास सुरूवात केली आहे. दुर्गा वाहिनीच्या उत्तर भारतातील समन्वयक रजनी ठकराल यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘हिमालय ध्वनी’ या मासिकाच्या ताज्या अंकात ‘घर वापसी’ अभियानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. आपला मुद्दा अधिक परिमाणकारकरित्या मांडण्यासाठी अंकाच्या मुखपृष्ठावर अभिनेत्री करिना कपूरच्या छायाचित्राला मॉर्फ करून मुस्लिम स्त्रियांची ओळख असणाऱ्या नकाबाने तिचा अर्धा चेहरा झाकण्यात आला आहे. या छायाचित्राखाली ‘धर्मांतरण ते राष्ट्रांतरण’ असा ठळक मथळाही छापण्यात आला आहे. दरम्यान, हा सगळा प्रकार किळसवाणा असून, असल्या फालतू प्रचाराला जास्त महत्त्व देऊ नये, अशी प्रतिक्रिया करिनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खान याने दिली आहे.