काश्मीर खोरे व लडाख भागात थंडीची लाट कायम असून कारगिल येथे तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले. कारगिल येथे उणे १६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून तेथे आधी उणे १३ अंश तापमान होते. राज्यात सर्वात कमी तापमान कारगिल येथे होते. लडाखमधील लेह येथे किमान तापमान उणे १०.९ अंश सेल्सियस होते ते तीन अंशांने कमी झाले आहे. आधीच्या रात्रीचे तापमान उणे ७.५ अंश होते. श्रीनगर ही काश्मीरची उन्हाळी राजधानी असून तेथे उणे २.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, तेथे तापमानात एक अंशाची घट झाली असून आधीच्या रात्री उणे १.४ अंश सेल्सियस तापमान होते. काश्मीरचे प्रवेशद्वार असलेल्या काझीगुंड येथे उणे ४.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दक्षिण काश्मीरमध्ये पहलगाम येथे उणे ५.६ अंश तापमानाची नोंद झाली. आधीच्या रात्री तिथे उणे ३.२ अंश तापमान होते. गुलमर्ग येथील स्कीइंग रिसॉर्ट येथे उणे ४ अंश सेल्सियस तापमान होते. उत्तर काश्मिरात कूपवाडात उणे ३.१ अंश सेल्सियस तर दक्षिण काश्मीरमध्ये कोकेरनाग येथे उणे २.६ अंश तापमानाची नोंद झाली, असे हवामान खात्याच्या प्रवक्तयाने सांगितले. काश्मीर खोऱ्यातील हवामान कोरडे व खंड आहे व ते काही काळ तसेच राहील. काश्मीरमधील थंडीच्या दिवसांना ‘चिलाई कलान’ म्हणतात व ४० दिवस तेथे हिवाळा तीव्र असतो.