सध्या सोशल मीडियावर दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरूद्ध (अभाविप) एक मोहीम चालविण्यात येत आहे. मात्र, आता या ऑनलाईन मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना धमक्या येऊ लागल्या आहेत. अशाप्रकारच्या धमक्या येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लेडी श्रीराम कॉलेजच्या गुरमेहर कौर या विद्यार्थीनीचाही समावेश आहे. गुरमेहर हिचे वडील कॅप्टन मनदीप सिंग हे कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यामुळे या सगळ्या प्रकाराकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. गुरमेहर हिने दिलेल्या माहितीनुसार, तिला सोशल मीडियावरून सध्या मोठ्याप्रमाणावर धमक्या येत आहेत. यापैकी अनेकांची मजल तर मला बलात्काराची आणि मारण्याची धमकी देण्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे मला भीती वाटत असल्याचे गुरमेहरने एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादाच्या नावाखाली अशाप्रकारे बलात्काराच्या धमक्या देणे योग्य नसल्याचेही तिने म्हटले.

गुरमेहर कौरने या प्रकाराची वाच्यता केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकजण तिला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. जरा हे पण ऐका. हाच भाजप पक्ष आहे. ते आपल्या देशाला उद्ध्वस्त करतील. त्यामुळे प्रत्येकाने या गुंडगिरीविरोधात आवाज उठवला पाहिजे, असे केजरीवालांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दिल्लीतील रामजस महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर देशातील अनेक भागात त्यांचा निषेध केला जात आहे. या विरोधात गुरमेहर कौर हिने अभाविपचा निषेध करणारी एक पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. मी दिल्ली विद्यापीठात शिकते आणि मी अभाविपला घाबरत नाही असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. मी एकटी नसून माझ्यासोबत अनेक जण आहेत. सर्व देश माझ्याबाजूने आहे असा फलक तिच्या हातामध्ये आहे. अभाविप कार्यकर्ते हिसेंचा जो वापर करत आहे तो थांबावा असे तिने म्हटले होते. हा केवळ एखाद्या व्यक्तीवर हल्ला नसून हा लोकशाहीवर हल्ला आहे असे तिने म्हटले होते. एआयएसए आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये रामजस कॉलेजमध्ये हाणामारी झाली. उमर खालीद आणि शेहला रशीद यांच्या भाषणाचा कार्यक्रम कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याविरोधात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यानंतर विद्यार्थी संघटनांमध्ये भांडणे लागली. नंतर त्यांच्या भाषणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अभाविपच्या दडपशाहीला उत्तर द्यावे असे तिने म्हटले आहे. हा लोकशाहीवरील हल्ला आहे सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हे थांबवावे असे तिने म्हटले होते.