Kargil War Veteran Amit Kumar Gupta Attacked: कारगिल युद्धादरम्यान ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय हवाई दलाचे निवृत्त ग्रुप कॅप्टन अमित कुमार गुप्ता यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. पार्किंगच्या वादातून लोखंडी रॉडने त्यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या हल्ल्यात गुप्ता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून डाव्या हाताचे हाड मोडले. त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० सप्टेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास सेक्टर ५८ मधील ‘एम३एम मॅग्नम बिझनेस पार्क’ येथे घडली. गुप्ता हे आपल्या कुटुंबासह रात्रीच्या जेवणासाठी येथील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. कुटुंबीयांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ सोडल्यानंतर ते गाडी पार्क करण्यासाठी गेले. मात्र तेथील पार्किंग कर्मचाऱ्यांनी त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चकरा मारायला लावल्या आणि गाडी पार्क करू दिली नाही, असे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
गुप्ता यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, व्हॅलेट एरिया, बेसमेंट आणि मल्टी-लेव्हल पार्किंगमध्ये फिरून झाल्यानंतर कर्मचारी जागा देण्यास नकार देत असल्याने त्यांनी गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका पार्किंग कर्मचाऱ्याने अचानक गाडीच्या खिडकीवर जोरदार ठोसे मारण्यास सुरुवात केली. गुप्ता यांनी गाडीतून खाली उतरून या प्रकाराबाबत जाब विचारला असता, त्या कर्मचाऱ्याने थेट लोखंडी रॉड काढून त्यांच्यावर हल्ला चढवला.
या हल्ल्यात गुप्ता यांच्या डोक्यावर आणि डाव्या हातावर रॉडने सपासप वार करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी सेक्टर ६५ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत पार्किंगच्या जागेवरून वाद झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी रामबीर सिंह यांनी दिली.
दरम्यान, सहायक पोलीस आयुक्त (मुख्यालय) अभिलक्ष जोशी यांनी सांगितले, “सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता गुप्ता यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. हल्ल्यात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले.” या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलीस प्रवक्ते एएसआय संदीप कुमार म्हणाले, “संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल.”
गुप्ता यांचे पोलिसांवर आरोप
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गुप्ता यांनी पोलीस आणि रुग्णालयावर काही आरोप केले आहेत. हेल्पलाईनवर फोन करूनही अर्धा तास कोणतीही मदत पोहोचली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. अखेरीस रेस्टॉरंटच्या शेफने मध्यस्थी केल्यामुळे माझा जीव वाचला, असे ते म्हणाले. तसेच खासगी रुग्णालयात योग्य उपचार झाले असले तरी त्यांनी पोलिसांना अचूक अहवाल दिला नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
