उन्हाळ्याचे दिवस आणि तब्बल १७,००० फूट उंचीवर बर्फाच्छादित डोंगर… अवतीभोवती फक्त गोळ्यांचा आणि तोफांचा आवाज. भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९ साली कारगिलचे युद्ध सुरू होते. या घनघोर युद्धात एक अशीही अनोखी घटना घडली, जिथे दोन्ही देशांचे तरुण अधिकारी समोरासमोर आले, त्यांनी पांढरा झेंडा दाखवून युद्ध थांबवले आणि शत्रू असूनही एकमेकांना सिगारेट आणि कॅडबरी चॉकलेट दिले!

ही सत्य कथा आहे भारतीय सैन्याचे कर्नल (निवृत्त) राजिंदर कुमार शर्मा यांची. त्यांच्या मुलांनी लिहिलेल्या ‘शूरवीर’ या पुस्तकात या प्रसंगाचा उल्लेख करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

असा घडला तो प्रसंग

युद्ध सुरू असताना लेफ्टनंट राजिंदर कुमार शर्मा आपल्या तुकडीसह ‘पॉइंट ५४६५’ कडे सरकत होते. अचानक पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. भारताचा रुद्रावतार पाहून पाकिस्तानी बंकरमधून अचानक एक पांढरा झेंडा दाखवण्यात आला. पांढऱ्या झेंड्याचा अर्थ ‘युद्ध थांबवून चर्चा करायची आहे’ असा होतो.

Kargil war
कारगिल युद्धादरम्यान मोक्याच्या पॉईंट ५४६५ कडे कूच करण्यापूर्वी, पुढच्या रांगेत सर्वात उजवीकडे कर्नल राज.

पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी चर्चा करण्यासाठी पुढे येत होते. पण भारतीय जवानांकडे पुढे जाण्यासाठी पांढरा झेंडाच नव्हता! अशा वेळी ‘लान्स नायक तुला राम’ या भारतीय जवानाने समयसूचकता दाखवत स्वतःची पांढरी बनियन काढली आणि ती रायफलच्या टोकाला बांधून पांढरा झेंडा तयार केला.

शत्रूची भेट आणि कॅडबरीची देवाणघेवाण

जीवाची पर्वा न करता लेफ्टनंट राजिंदर कुमार डोंगरावर पुढे गेले. तिथे त्यांची भेट पाकिस्तानच्या मेजर जावेद यांच्याशी झाली. मेजर जावेद अत्यंत नीटनेटके कपडे घालून आले होते, जणू काही ते आत्ताच सलूनमधून आले असावेत! दोघांमध्ये चर्चा झाली. मेजर जावेद यांनी भारताला गोळीबार न करण्याची विनंती केली आणि राजिंदर यांना सिगारेट देऊ केली. दोघांनी एकत्र सिगारेट ओढली. या बदल्यात भारतीय अधिकारी राजिंदर यांनी आपल्या खिशातील ‘कॅडबरी चॉकलेट’ मेजर जावेद यांना दिले. ही कॅडबरी त्यांना आपत्कालीन रेशन म्हणून मिळाली होती.

रिकाम्या पोटी मिळवला विजय

या भेटीनंतर भारतीय सैन्याने मागे न हटता अत्यंत कठीण परिस्थितीत, उणे तापमानात आणि शत्रूने पेरलेल्या सुरुंगांची पर्वा न करता ‘पॉइंट ५४६५’ वर तिरंगा फडकवला. विजय मिळवल्यानंतर राजिंदर कुमार यांनी पाकिस्तानी मेजरने दिलेल्या सिगारेट आपल्या जवानांना वाटल्या. तेव्हा जवान आनंदाने म्हणाले, “वाह साहेब, तुम्ही आम्हाला थेट पाकिस्तानातली सिगारेट दिलीत!”

kargil war story
लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक आणि एअर चीफ मार्शल ए. वाय. टिपणीस कारगिल सेक्टरमध्ये लष्करी जवानांसोबत. (एक्सप्रेस आर्काइव्ह)

कर्नल शर्मा हे एक शूर अधिकारी आहेत. त्यांना त्यांच्या लष्करी कारकिर्दीत कीर्ती चक्र, शौर्य चक्र आणि सेना मेडल अशा तीन शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

“कारगिल हे केवळ युद्ध नव्हते, तर तो एक संदेश होता, भारताचे सुपुत्र प्राण देऊ शकतात, पण कधीही झुकणार नाहीत. शत्रूला अजूनही आमचा हाच संदेश आहे की, पुन्हा प्रयत्न करून बघा, आम्ही पुन्हा कारगिल घडवून दाखवू!” – कर्नल (निवृत्त) राजिंदर कुमार शर्मा