कर्नाटक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भाजपाची प्रचाराच्या आघाडीवर निराशाजनक सुरुवात झाली आहे. शनिवारी मांडयामध्ये अमित शहांच्या सभेला फारशी गर्दी जमली नव्हती. सभास्थळी स्वागताला रिकाम्या खुर्च्यापाहून शहांचा पारा चढला. कर्नाटकातील भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांना शहांच्या संतापाचा सामना करावा लागला. या कार्यक्रमात अमित शहांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रम ठरलेल्या वेळेपेक्षा उशिराने सुरु झाल्यामुळे शेतकरीही कंटाळले होते. बंगळुरु मिररने हे वृत्त दिले आहे.

मांडयामधल्या कार्यक्रमाला २ हजार शेतकरी उपस्थित होते. पण कार्यक्रम ठरलेल्या वेळेपेक्षा खूप उशिराने सुरु झाला. शेतकरी खूप वेळ ताटकळत होते. त्यामुळे शहा येण्याच्याआधीच अनेकांनी सभा स्थळाहून काढता पाय घेतला असे एका भाजपा नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

फक्त ७०० शेतकरी उपस्थित होते. ते दृश्य पाहून अमित शहांनी येडियुरप्पांकडे आपली नाराजीची भावना व्यक्त केली. शहांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी २० मिनिटांचे भाषण केले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसोबत भोजन घेतले व पुढच्या नियोजित कार्यक्रमाला निघून गेले. याआधी अमित शहा यांनी एका पत्रकारपरिषदेला संबोधित करताना विरोधकांना भ्रष्ट म्हणण्याऐवजी येडियुरप्पांना भ्रष्टाचारी म्हटले होते. त्यावेळी शेजारी बसलेल्या नेत्यांने त्यांना चूक लक्षात आणून दिली. भ्रष्टाचारासाठी स्पर्धा झाली तर येडियुरप्पा सरकारला भ्रष्टाचारामध्ये नंबर एकचा पुरस्कार मिळेल असे अमित शहा म्हणाले होते.

त्यानंतर एका सभेमध्ये अमित शहांचे हिंदीतील भाषण कन्नडमध्ये ट्रान्सलेट करताना प्रल्हाद जोशी म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित, गरीब आणि मागासांसाठी काही करणार नाहीत. ते देशाचे नुकसान करणार, त्यांनाच मतदान करा. खरतंर अमित शहा असं म्हणाले होते कि, सिद्धारामय्या सरकारने कर्नाटकचा विकास केलेला नाही. तुम्ही पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेऊन येडियुरप्पांना मतदान करा. आम्ही कर्नाटकाला देशातील उत्तम राज्य बनवू. पण प्रल्हाद जोशी यांनी ट्रान्सलेट करताना अर्थाचा अनर्थ केला.